पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वालखेड्यात शेतमजुराची हत्या

वालखेडा शेत-शिवारातील घटना : आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर घटनेचा उलगडा

भुसावळ/नरडाणा : पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून नरडाणा पोलिस ठाणे हद्दीतील वालखेडा (ता.शिंदखेडा) येथील 42 वर्षीय शेतमजुराचा नात्यातील दोघांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर वालखेडा गावाजवळील शेतात घडली. या प्रकरणी नरडाणा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेत साहेबराव उर्फ सायबू भीमराव मोरे (42) यांचा मृत्यू झाला तर संशयीत आरोपी मंगा उत्तम मोरे (45) व चेतन बारकू मोरे (31) यांना अटक करण्यात आली. मयत सायबू मोरे याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोमवारी वालखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनैतिक संबंधाच्या संशयातून काढला काटा
संशयीत आरोपी मंगा मोरे याच्या पत्नीशी मयत सायबू मोरे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी मंगा मोरे यास होता तसेच आरोपी चेतन मोरे व सायबू यांच्यातील आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद होत असल्याने दोघा आरोपींनी शुक्रवारी रात्री सायबू मोरे यास सोबत घेत वालखेडा गावाजवळील अकिल पिंजारी यांच्या मक्याच्या शेतात नेले व तेथे काठ्यांनी तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व या घटनेत सायबू मोरे यांचा मृत्यू झाला.

आधी केला मृतदेह सापडल्याचा देखावा
दोघा आरोपींनी सुरूवातीला काही केलेच नसल्याचा देखावा केला तर शेत मालक अकिल पिंजारी यांच्या शेतात मृतदेह असल्याची माहिती आरोपी मंगा मोरे याने गावातील पोलिस पाटलासह ग्रामस्थांना दिली मात्र काही प्रश्न उपस्थित होताच आरोपी गडबडल्याने त्याच्यावर संशय वाढला तर दुसरीकडे आरोपी चेतन मोरे हा सोनगीर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी स्वतःहून हजर झाल्यानंतर त्याने घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यास ताब्यात घेवून नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दोघांविरोधात खुनाचा गुन्हा
नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे, उपनिरीक्षक शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांनीही वालखेडा येथे भेट देत पाहणी केली. मयत सायबू यांची आई विमलबाई भीमराव मोरे ( 70) यांच्या फिर्याछीनुसार आरोपी मंगा मोरे, चेतन मोरे यांच्या नरडाणा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय मनोज ठाकरे करीत आहेत. दरम्यान, मयत सायबू यांच्या मृतदेहावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.