पत्नीसह सात जणांवर गुन्हा

0

वाकड (प्रतिनिधी) – सतत पैशाची मागणी करत, कर्ज काढायला भाग पाडून पतीला मारहाण करणार्‍या पत्नीसह एकूण सात जणांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रहाटणीत शुक्रवारी (दि.26) घडली होती. हाजीमलंग काशिमसाहब मुल्ला (रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. मयताचा भाऊ नबीलाल मुल्ला (वय29, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.

पैशासाठी पतीला त्रास, मारहाण
या आत्महत्या प्रकरणी मयताची पत्नी सपना हाजीमलंग मुल्ला (वय 29), रंजना प्रकाश शिर्के (वय 50), अतिश प्रकाश शिर्के (वय 32), सुजाता अतिश शिर्के (वय 28), प्रकाश शिर्के (वय 55, सर्व जण रा. साई संकुल, धनगरबाबा मंदिरासमोर, रहाटणी), संदीप वाघमारे (वय 35) आणि विकास म्हस्के (35) अशी आरोपींची नावे आहेत. हाजीमलंग आणि सपना यांचा 2014 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून सपना व तिचे नातेवाईक हाजीमलंग याच्याकडे सतत पैशाची मागणी करत असत. त्यामुळे हाजीमलंग याने कर्ज काढले होते. तरीदेखील त्याला त्यांच्याकडून मारहाण केली जात होती. या त्रासाला कंटाळून हाजीमलंग याने राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये हाजीमलंग याने या सर्व त्रासाची कारणे दिली आहेत. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.