विषारी द्रव प्राशनानंतर उपचारापूर्वीच झाला मृत्यू ; गावात सर्वत्र हळहळ
भुसावळ- पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आपले कसे होणार ? या विवंचनेत बोदवड तालुक्यातील चिंचखेडासीमच्या 43 वर्षीय वतीने विषारी द्रव सेवन करून मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत चिंचखेडासीम गावावर शोककळा पसरली आहे. आत्माराम रामभाऊ पाटील (43, रा.चिंचखेडासीम) असे मयत पतीचे नाव असून 48 तासांपूर्वीच त्यांच्या पत्नी सुनीताबाई आत्माराम पाटील (35, रा.चिंचखेडासीम) यांचा मृत्यू झाला होता. आई-वडीलांच्या मृत्यूनंतर चिमुकल्या दोन्ही मुलांचे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू
बोदवड तालुक्यातील चिंचखेडासीम येथील 35 वर्षीय विवाहिता सुनीताबाई आत्माराम पाटील (35) यांना शेतात बैलाने शिंग मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 29 रोजी घडली होती तर या विवाहितेचा नेमक्या मृत्यूच्या कारणांविषयीदेखील स्पष्टता नसल्याने पोलिसांनी व्हिसेरा प्रिझर्व्ह केला होता. 30 रोजी या विवाहितेच्या मृतदेहावर मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे अंत्यसंस्कार झाले होते तर पत्नीच्या मृत्यूनंतर आपले कसे होणार ? ही चिंता पती आत्माराम पाटील यांना सतावू लागल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी द्रव्य सेवन केले. त्यांना तातडीने बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. बोदवड पोलिसात या प्रकरणी प्रकाश संतोष पाटील (42, चिंचखेडासीम) यांनी दिलेल्या खबरीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत.