अरुण साधू यांचे मुंबईत निधन
पुणे/मुंबई : पत्रकारितेतील साधू अशी ज्यांची ओळख होती ते ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईतील सायन रुग्णालयात निधन झाले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. त्यांची हृदयक्रिया बांधीत झाल्याने रविवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. परंतु, उपचारांना प्रतिसाद न देताच त्यांनी प्राणत्याग केला, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता जयश्री मोंडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आले. दुपारपर्यंत ते अंत्यदर्शनासाठी ठेवून नंतर देहदानाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून पार पडलेली त्यांची कारकीर्द नेहमीच लक्षात राहणारी ठरली आहे.
साम्यवादी क्रांतीचा इतिहास मांडला
अरुण साधू यांनी पत्रकारिता व साहित्याच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला होता. जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास त्यांनी अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविला होता. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. वयोमानामुळे साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर यापूर्वी अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आलेली होती. तसेच, हृदयविकाराचा आजारही त्यांना होता. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती सायनच्या अधिष्ठाता जयश्री मोंडकर यांनी दिली.
साधू यांची कारकीर्द…
अरुण साधू यांनी पुण्यातून प्रकाशित होणारे दैनिक केसरीसह माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. तसेच, झिपर्या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबर्याही त्यांनी लिहिल्या असून, त्या गाजलेल्या आहेत. ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुखही होते. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठाणचा जनस्थान हा मानाचा पुरस्कार व अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.