पथदिव्यांच्या ‘अर्थिंग’चा पालिकेला झटका

0

काम न करताही लाखोंचा निधी ठेकेदारांच्या खिशात

पुणे : शहरातील पथदिव्यांना अर्थिंग नसल्याचे कारण देत, क्षेत्रिय कार्यालयांकडून लाखो रुपयांचा निधी कोणतेही काम न करता ठेकेदारांच्या खिशात घातले जात असल्याचे चित्र आहे. पथदिवे बसविणार्‍या ठेकेदारानेच त्यांना ‘अर्थिंग’ वायर जोडणे आवश्यक असताना, त्या बसविल्या नसल्याचे दाखवत क्षेत्रिय कार्यालयांकडून ‘अर्थिंग’च्या कामाच्या
प्रत्येकी 10 निविदा तुकड्या-तुकड्याने काढल्या जात आहेत.

शहरात महापालिकेचे सुमारे 1 लाख 32 हजार पथदिवे आहेत. त्यातील अनेक पथदिवे जुने झाल्यास काढले जातात. तर नवीन पथदिव्यांसाठी नगरसेवकांनी अंदाजपत्रकात ‘स’ यादीमध्ये निधी दिल्यानंतर खरेदी केले जातात. हे पथदिवे खरेदी केल्यानंतर ज्या ठेकेदाराकडून ते खरेदी करण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडूनच ते बसवून घेतले जातात. त्यामुळे त्यांनी पथदिवे बसवून तसेच त्यासाठी आवश्यक असलेले सर्व खबरदारीचे उपाय आर्थिंग जोडूनच महापालिकेस देणे बंधनकारक आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात सुमारे 12 हजार पथदिवे ठेकेदारांनी ‘अर्थिंग’ वायर न जोडताच उभारून दिल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले. जो ठेकेदार पथदिवे बसवितो, त्याने ‘अर्थिंग’ यंत्रणा उभारून देणे बंधनकारक आहे. पण, पालिकेने शहरात केलेल्या तपासणीत 12 ते 15 हजार पथदिवे ‘अर्थिंग’ नसलेले आढळून आले आहे. प्रत्यक्षात ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे पालिकेस कळविल्यानंतर क्षेत्रिय कार्यालयांकडून थर्ट पार्टी’ सल्लागार आणि संबंधित खात्याच्या अभियंत्यांकडून संबधित काम तपासून पाहिले जाते. त्यानंतर काम योग्य, की अयोग्य याची शिफारस केली जाते. त्यानंतरच ठेकेदारांची बिले दिली जातात. ‘थर्ट पार्टी ऑडिट’ करणार्‍यांनी काय ‘ऑडिट’ केले, असा प्रश्‍नही या प्रकारामुळे समोर येत आहे. त्यानंतरच ठेकेदारांची बिले दिली जातात. ‘थर्ट पार्टी ऑडिट’ करणार्‍यांनी काय ‘ऑडिट’ केले, असा प्रश्‍नही या प्रकारामुळे समोर येत आहे.

बिले न देण्याचे आदेश

वास्तविक पाहता ज्या ठेकेदारांनीच ‘अर्थिंग’ करून देणे आवश्यक आहे. ज्यांनी दिले नाही, त्यांना बिले देऊ नयेत असे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे ज्या-ज्या क्षेत्रिय कार्यालयांनी अशा निविदा काढल्या आहेत, त्याची माहिती घेऊन त्यानंतरच हे काम करून घेतले जाईल. अशाच कामांची बिले दिली जातील, असे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी स्पष्ट केले.