पदचार्‍यांना मागून धडक देणाऱ्याची अटीशर्तीवर सुटका

0

जळगाव | टॉवर चौकाकडून सतरा मजलीकडे पायी जाणार्‍या पदचार्‍यांना मागून धडक देवून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने संशयित मोटारसायकलस्वराला दोषी ठरवून चांगल्या वर्तणुकीच्या अटीशर्तीवर व जातमुचलक्यावर त्याची सुटका केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील वनमाला आनंद जैन व त्यांची मुलगी नेहा हे २७ एप्रिल २०१३ रोजी रात्री ९.३० वाजता बर्फ गोला खाण्यासाठी टॉवर चौकाकडून सतरा मजलीकडे पायी जात असतांना मागून भरधाव वेगात आलेल्या एमएच १९ एझेड ०८११ क्रमांकाच्या मोटारसायकलीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात दोन्ही मायलेकी जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलिसात भादवी कलम २७९, ३३८, मोटार व्हेईकल ऍक्ट १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्या.एन.के.पाटील यांच्या न्यायालयाने मोटारसायकलस्वार राजू हिरालाल मुरकुटे रा. इंदिरानगर, जळगाव खुर्द याला दोषी ठरवून त्याची चांगल्या वर्तणुकीच्या अटीशर्तीवर व जातमुचलक्यावर त्याची सुटका केली आहे. सरकारपक्षातर्फे ॲङआशा शर्मा व ऍड. बारगजे यांनी कामकाज पाहिले.