पदपथांच्या दुरुस्तीसाठी 35 कोटींची तरतूद

0

पुणे । शहरातील प्रमुख दहा रस्त्यांवरील पदपथांना लवकरच नवे रूप मिळणार आहे. महापालिकेच्या अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स अंतर्गत सुमारे 100 किलोमीटरच्या पदपथांची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी अंदाजपत्रकात तब्बल 35 कोटी रुपयांची तरतूद असून या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पथ विभागाने दिली आहे.

नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावर सुरक्षितपणे चालता यावे, तसेच प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्सच्या माध्यमातून शहरातील पदपथांचा विकास करण्यात येणार आहे. महापालिकेकडून सध्या जंगली महाराज रस्त्यावर हे काम सुरू आहे. याच धर्तीवर शहरातील आणखी दहा रस्त्यांची निवड करण्यात आली असून या रस्त्यावरही सलग पदपथ, कोंडी फोडण्यासाठी चौकांच्या रचनेत बदल तसेच या पदपथांवर अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठीच्या उपाययोजना करण्यात येणार आहे.ज्या रस्त्यांवर शक्य आहे, त्या रस्त्यावर नव्याने सायकल ट्रॅक उभारणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार, या दहा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचे आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिनाभरात हे आराखडे तयार करून तसेच त्याच्या आवश्यक मान्यता पूर्ण करून ते सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.