येरवडा । येरवडा-खडकी मार्गावरील कर्नल यंग शाळेसमोरील पदपथ नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. पदपथाची दुरवस्था अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असून झोपी गेलेल्या पालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक जावेद इनामदार यांनी केला आहे. पदपथाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इनामदार यांनी दिला आहे.
येरवडा परिसरातून खडकीकडे जाणारा हा मार्ग पुढे मुंबई महामार्गाला जोडत असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पादचार्यांसाठी लाखो रुपये खचर्र् करून पदपथ बांधण्यात आले आहेत. मात्र या पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्यानेच चालण्याची वेळ येते. त्यातच येणार्या वाहनांमुळे एखाद्या दिवशी काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल इनामदार यांनी केला आहे.
एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांचा गाजावाजा जरी करण्यात येत असला तरी पण मुख्य कामाकडेच अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. तरी दुरवस्था झालेल्या पदपथाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात यावे अन्यथा पक्षाच्या वतीने येरवडा क्षेत्रिय कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इनामदार यांनी दिला आहे. यावेळी नारायण गलांडे, ऋषी परदेशी, महेश पाटील, मनोज पाचपुते, निखिल बटवाल, नितीन राठोड, रोहित राठोड, हितेश चंडालिया, सैनिक राजगुरू, गौरव शर्मा, शुभम साबळे, अजय पवार, साहिल खान, अकील सय्यद, रज्जत महाडिक, राजू भालशंकर उपस्थित होते.
मोठा खड्डा खोदला आहे
पदपथालगत शाळा असून सकाळ-संध्याकाळ शालेय विद्यार्थी याच मार्गावरून येत असतात. त्यामुळे असलेले पदपथ हे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळी लाइन टाकण्याचे काम चालू असून ते अर्धवट अवस्थेत आहे. तेथे मोठा खड्डा खोदण्यात आला असून केबल ही अस्थाव्यस्त पडल्या आहेत. रात्रीच्या सुमारास पदपथावरून जाताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिक पडल्याच्या घटना वारंवार घडत असताना देखील संबंधित कामाकडे दुर्लक्ष होत आहे. पदपथावर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लोखंडी जाळी लावण्यात आली असली तरी पण ती मुख्य प्रवेशद्वाराजवळ नसल्याने पदपथ धोकादायक बनला आहे.
विकास कामांमध्ये इतर भागात अशीच परिस्थिती?
शाळेच्या परिसरातच जर पदपथाची अशा प्रकारे दुरवस्था झाली असेल तर प्रभागात इतर भागात काय परिस्थिती असेल; हे सांगणे कठीण असून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनेतून पदपथाची दुरुस्ती लवकर करण्यात यावी.
– नारायण गलांडे
वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलन
यासंदर्भात वारंवार पालिका अधिकार्याकडे तक्रार करून देखील ते गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करत असून यावर उपाययोजना न झाल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
– ऋषी परदेशी
अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस