पदपथ मुक्तीसाठी मनसे करणार जनजागृती

0

मुंबई । शहर फेरीवाले मुक्त व्हावे, किमान रेल्वे परिसरातील फेरीवाले हटवले जावेत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 ऑक्टोबरपासून विशेष कार्यक्रम आखत आहे. या पार्श्‍वभूमीवर संताप मोर्चा, मनसे मूक आंदोलन आणि आता पथनाट्यातून जनजागृती या विशेष कार्यक्रमांचे आयोजन मनसे अध्यक्ष आणि कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. सोमवारी 13 नोव्हेंबरला दादरच्या सुविधा स्टोअर्स समोर रेल्वे परिसर फेरीवाले मुक्त करण्यासाठी मनसेने पथनाट्याचे आयोजन केले होते. पथनाट्याच्या माध्यमातून यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी केलेले आंदोलन, फेरीवाल्यांमुळे प्रवाशांचा गुदमरून गेलेला श्‍वास, प्रवाशांना त्रासदायक ठरणारे मुजोर फेरीवाले असे विविध विषय पथनाट्य सादर करणार्‍या कलाकारांनी मांडले.

आंदोलनास जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न
याप्रसंगी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे, दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, माहीमचे शाखा अध्यक्ष राजन पारकर, उपशाखा अध्यक्ष रुपेश तांडेल त्याचबरोबर दादर माहीम विधानसभेतील अनेक मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेकडे एक नेता, एक आमदार, एक नगरसेवक जरी राहिला असला तरी माध्यमांच्या चर्चेत रहाण्यासाठी पक्षांचे कार्यकर्ते नेहमीच धडपड करताना पाहायला मिळतात एवढे नक्की. रेल्वे परिसर फेरीवाले मुक्त होत असला तरी मनसेच्या या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जनजागृती होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

दीर्घकालीन आंदोलन असल्याने ‘मनसे’ प्रयत्न
हे आंदोलन एक दिवसीय आंदोलन नसल्यामुळे जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. लोकांनी खरेदी केली नाही, तर फेरीवाले बसणार नाहीत. म्हणून सनदशीर मार्गाने जनजागृती करण्यासाठी आज पथनाट्य आयोजित केले आहे. फेरीवाल्यांची संख्या वाढली याला शिवसेना जबाबदार आहे. यांनी आपल्या स्वार्थासाठी फेरीवाला सर्व्हे केला नाही. ही फेरीवाले संघटना आज काल उगवली यापूर्वी मला कधी आठवत नाही. शिवसेनेचे हप्ते बंद झाल्यामुळे त्यांना आता मराठी फेरीवाले आठवत आहेत. आयुक्तांशी बोलून राज ठाकरे याबाबत निर्णय घेतील. काँग्रेस आणि शिवसेना हे मतांचे राजकारण करत आहेत, असा आरोप दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी यावेळी केला आहे.