पुणे । दहावी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सोमवार (दि.28) आणि मंगळवारी (दि.29) प्रवेश फेरी घेण्यात येणार असून दोन दिवसात इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने या विद्यार्थ्यांना देखिल प्रवेशाची संधी मिळणार आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरावरील रिक्त जागा भरण्यासाठी सोमवारी प्रवेशप्रक्रिया होणार आहे. एसएससी थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची फेरी 28 व 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून संस्थास्तरावर प्रवेशाच्या रिक्त जागा राहिल्या आहेत. या रिक्त जागेवर प्रवेश संस्थास्तरावर भरण्यासाठी राज्य शासनाने परवागनी द्यावी, असा प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाने पाठविला होता. त्यास राज्य शासनाने मुभा दिली आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 28) जाहीर होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरला आहे, पण काही कारणास्तव प्रवेश घेतला नाही. त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.