पदवीधरची उत्कंठा शिगेला

0

धुळे । विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी शांतीपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक पदवीधर मध्ये एकूण 38.29 टक्के मतदान झाले असून धुळे जिल्ह्यात 61.39 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुक रिंगणात नाशिक मध्ये एकूण 256472 मतदार संख्या होती. यापैकी 15607 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक पदवीधरमध्ये मुख्य लढत काँग्रेसच्या डॉ.सुधीर तांबे आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश देसले आणि भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांच्यात आहे. या शिवाय 14 अपक्ष रिंगणात आहेत. धुळ्यात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. या निवडणुकीच्या मतदानदरम्यान धुळे-नंदुरबार जिल्ह्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून आता बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काही ठिकाणी पैशांचा बोलबाला!
सुशिक्षीत असलेल्या या पदवी प्राप्त मतदारसंघातही काही ठिकाणी पैशांचा बोलबाला होता, अशी प्रतिक्रिया या मतदान दरम्यान नागरिक देतांना दिसत होते. पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत ज्या प्रकारे मतदारांना पैशांचे आमिष दाखवून इच्छित उमेदवाराला मतदान करण्याचा आग्रह होतांना दिसून येतो, तसा प्रकार या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही होत असेल आणि सुशिक्षितच राज्य घटनेने बहाल केलेला मतदानाचा अमुल्य अधिकार विकत असतील तर तेथे अशिक्षितांकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्‍न या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेतून उपस्थित होत आहे.

नवापूरमध्ये तुरळक गोंधळानंतर सुरुळीत
नवापूर । नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात नवापूर तालुक्यात झालेल्या मतदानात एकुण 1100 पैकी 706 पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. यात शिक्षक व शिक्षिका, महाविद्यालय प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच पदवीधर युवक व युती व शासकीय कर्मचारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरूवातीला संथपणे चालणारे मतदान दुपारी 2 वाजेपासून मोठ्या प्रमाणात वाढले. शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी मोठी गर्दी करून आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुक केंद्र अध्यक्ष म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालय येथील नायब तहसीलदार प्रविण बागुल, तहसीलदार प्रमोद वसावे, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी काम पाहीले. अनमोल रविंद्र गावीत या मतदाराने मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याची ओळख पटल्यानंतर मतदान कक्षात मतदान करण्यासाठी पाठविण्यात आले. मतदान केल्या नंतर सदर मतदाराने त्यास दिलेली मतपत्रिकेचे तीन तुकडे करून खिशात ठेवले. मतदान केंद्राबाहेर जाण्याचा तयारीत असताना त्यास पकडण्यात आले व त्याचाकडुन तीन तुकड्याची मतपत्रिका जप्त करण्यात आली. सदर इसमास मतदान केंद्रावर नेमणुकीत असलेल्या पोलिस कर्मचारी मधुकर तडवी यांचा ताब्यात दिले. निवडणुक प्रक्रियेचा भाग असलेल्या मतपत्रिका सीलबंद पाकीटात निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास पाटील यांचा मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा पो.कॉ प्रशांत यादव,दिलीप चौरे,पोलिस नाईक मधुकर तडवी करीत आहेत.

मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी
निवडणुकीच्या मतदानदरम्यान धुळे-नंदुरबार जिल्ह्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील या दोघा उमेदवारांमध्ये चुरशीची मतदान प्रतिक्रीया सुरु होती. धुळे व नंदुरबारात सकाळी 10 नंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. यावेळी धुळे शहरात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, आ. कुणाल पाटील यांच्यासह अनेक राजकीय पक्षासह अधिकार्यांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात खरी लढत ही डॉ. सुधीर तांबे व डॉ. प्रशांत पाटील यांच्यात होत आहे. यासाठी आज सकाळी 8 ते 4 वाजेच्या दरम्यान मतदान होत आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 25 हजार मतदार असून एकट्या धुळे शहरात 11 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. धुळे जिल्ह्यात 33 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली गेली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुशिक्षितांच्या या मतदार संघात किमान निपक्षपातीपणे मतदान व्हावे ही अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

यंदा चुरस निर्माण
भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांनी उमेदवारी केल्याने यंदा चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे व भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांच्यात खरी चुरस आहे. यात कोण बाजी मारेल याची सर्वांना उत्सुकता आहे उमेदवार एकुण 14 आहेत त्यामुळे रंगत वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 14 हजार 822 मतदारांसाठी 16 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. पदवीधर व युवा नवपदवीधर मतदार उत्फुर्तपणे मतदान केले. मतदानासाठी बाहेर रांगा लागल्या होत्या. धुळे जिल्ह्यात एकूण 61.39 टक्के मतदान झाले असून 64.94 टक्के पुरुष तर 51.99 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.