पदाधिकारी, आयुक्त, पोलीस आयुक्तांनी केली पाहणी 

0
पोलीस आयुक्तालयाचे 10 रोजी प्रेमलोक पार्कमध्ये स्थलांतर
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीचे काम लवकरच पुर्ण केले जाईल. 10 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडून इमारत पोलिसांच्या ताब्यात दिली जाईल. पोलिसांचे साहित्य ‘शिफ्टींग’ झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे कामकाज सुरु आहे. उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी शुक्रवारी इमारतीच्या कामाची पाहणी केली. तसेच काम वेगात पुर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
ऑटोक्लस्टरमधून काम सुरू
पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमधून आयुक्तालयाचे कामकाज सुरु आहे. पोलीस आयुक्तालय चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये कायमस्वरुपी होणार आहे. इमारतीमध्ये स्थापत्य, फर्निचरची कामे सुरु आहेत. या इमारतीत नवीन बांधकाम, रंगरंगोटी, रस्ते, फर्निचर अशा विविध प्रकारची काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे महापालिका येत्या 10 डिसेंबरपर्यंत सर्व कामकाज पुर्ण करणार आहे. त्यानंतर इमारत पोलिसांच्या ताब्यात दिली जाईल. पोलिसांचे साहित्य ‘शिफ्टींग’ झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु होईल, असे पवार यांनी सांगितले.