अतिकालिक भत्त्यांवर येणार संकट
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसचिव कार्यालयांतर्गत येणार्या पदाधिकार्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक, शिपाई यांच्या कामकाज वेळात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा अतिकालिक भत्त्यांवर संकट येणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या तिसर्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, विविध पक्षांचे गटनेते यांची कार्यालये आहेत. तिसर्या मजल्यावर एकूण स्वीय सहाय्यक आणि शिपाई असे 51 कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांना 1800 रुपये भत्ता दिला जातो. परंतु, प्रशासनाने अतिकालिक भत्त्यामध्ये बचत करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या कामकाजाचा वेळा बदलण्यात येणार आहेत. त्यानुसार एका कर्मचार्याला सकाळी दहा ते पावणेसहा अशी जनरल शिफ्ट तर दुसर्या कर्मचार्याला दुपारी 12 ते रात्री पावणेआठ असे करण्याचे नियोजन आहे.
निर्णय स्थायीने घ्यावा
या कर्मचार्यांना पदाधिकार्यांच्या खासगी कामासह शासकीय कामे करावी लागतात. महासभा, विशेष समितींच्या सभा असल्यास कर्मचार्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. हे कर्मचारी इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडतात. तरीही, असा निर्णय घेतल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. त्याबाबत त्यांच्याकडून तशी नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले की, या कर्मचार्यांच्या अतिकालिक भत्त्याबाबत लेखापरीक्षणात आक्षेप घेतला जातो. त्यामुळे हे धोरण ठरविले आहे. याबाबतचा निर्णय स्थायी समितीने घ्यावा.