मुंबई : शास्त्रीय संगीतामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रख्यात सूरबहार वादक ‘पद्मभूषण’ अन्नपूर्णा देवी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अन्नपूर्णा देवी वयोमानामुळं थकल्या होत्या. त्यांना शारीरिक त्रासही जावणत होता. प्रकृती खालावल्यामुळं काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अन्नपूर्णा देवी यांचा जन्म मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७मध्ये झाला होता. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडील होते. त्यांच्याकडूनच अन्नपूर्णा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार व सूरबहार वादनावर हुकूमत मिळवली. पुढं सूरबहार या वाद्याशी त्याचं नाव जोडलं गेलं. शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पंडीत हरिप्रसाद चौरसिया , निखील बॅनर्जी, आशीश खानसारखे दिग्गज संगीतकार त्यांचे शिष्य होते. शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारनं ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.