पद्मशंख लूट प्रकरणी : तिघा आरोपींकडून दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त

0

मुक्ताईनगर : पद्मशंख देण्याच्या नावाखाली इंदौरच्या इसमाला मधापुरी शिवारात 10 मे 2019 रोजी लुटण्यात आले होते. तिघा आरोपींनी दोन लाखांच्या रोकडसह दोन सोन्याच्या अंगठ्या मारहाण करीत लांबवल्या होत्या. या प्रकरणी प्रवीण खयालीलाल शर्मा (रा.द्वारकापुरी, इंदौर) यांच्या तक्रारीनुसार मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींचा मोबाईल क्रमांक मुक्ताईनगर पोलिसांना देण्यात आले होते तर कुर्‍हा येथे आरोपी आल्यानंतर त्यांनी मोबाईल सुरू करताच जळगाव सायबर शाखेला माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांना याबाबत कळवण्यात आल्यानंतर आरोपींच्या सापळा रचून मुसक्या आवळण्यात आल्या.

आरोपींकडून गुन्ह्यातील अंगठ्या जप्त
पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळंके एएसआय माधव पाटील, सुनील बडगुजर, अनिल सोनवणे, सुरेश पवार, भगवान पाटील, संजय लाटे आदींच्या पथकाने संशयीत आरोपी परमेश्‍वर उर्फ खलनायक बबन भोसले (25) तसेच राहुल लायटर पवार (30) रींकू धप्पा भोसले (20, तिन्ही रा.अस्वलधारा, साकोरे, नांदगाव) यांना रविवारी दुपारी एक वाजता कुर्‍हा येथील आठवडे बाजारातून पाठलाग करून अटक केली होती. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या. तीन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर खलनायक भोसले यास 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर उर्वरीत दोघांना ओळखपरेडसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.