भोपाळ, इंदूर, जयपूरमध्ये जाळपोळ, तोडफोड
नवी दिल्ली : प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावरून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात राज्यांसह उत्तप्रदेशात हिंसाचार उफळला आहे. उत्तरप्रदेशात 200 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळमध्ये राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत तणाव निर्माण केला. जयपूरमध्येही राजपूत समाज रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळ होत असल्याचे दिसून आले होते. 25 जानेवारीरोजी हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होत असून, तत्पूर्वीच देशभरात वातावरण पेटविले जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पाच राज्यात हिंसाचार!
देशातील पाच राज्यांत पद्मावत सिनेमाच्या विरोधात असंतोष भडकू लागला आहे. इंदूरमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, त्यांनी तोडफोड व जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गुजरातकडे जाणारी बससेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. काही ठिकाणी मॉलमध्येदेखील हिंसाचार झाल्याचे वृत्त आले आहे. सिनेमाचे पोस्टर फाडण्यात आले असून, सर्व सिनेमागृहे व मल्टीप्लेक्स यांची सुरक्षा वाढविण्यात आलेली आहे. भोपाळ, रतलाम, उज्जैन या मोठ्या शहरातदेखील हिंसाचार उफळला होता. उत्तरप्रदेशातही गौतमनगर, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबादसह अनेक शहरात हिंसाचार दिसून आला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. करणी सेनेचे नेते लोकेंद्रसिंह कालवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की लोकांनीच हा सिनेमा पाहू नये. जेणे करून देशात कुठेही हिंसाचार होणार नाही. दुसरीकडे, मरुधर सिने एण्टरटेेंटमेण्ट व यशराज जय पिक्चर्स या वितरक संस्थेने या सिनेमाचे वितरण न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.