‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’लाही कात्री

0

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांपासून पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावरून चित्रपटसृष्टी तसेच राजकारणात ढवळून निघाले होते. या चित्रपटाच्या पदर्शनावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहा सदस्यांच्या समितीने पद्मावती चित्रपटाच्या वादावर तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून, त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत करावे, अशी सूचना केली आहे. समितीने सूचवलेले बदल केल्यानंतरच पद्मावती चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

काल्पनिक चित्रपट असल्याचे स्पष्ट करा
समितीने सध्या गाजत असलेल्या घुमर या गाण्यातही काही बदल सूचवले आहेत.दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नमते घेतल्यासच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असे सध्यातरी दिसत आहे. चित्रपटाच्या नाव बदलण्याची सूचना करण्यात आली असून, आणखी काही बदलही सूचवण्यात आले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येणार्‍या डिस्क्लेमरमध्ये हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून, तो काल्पनिक चित्रपट असल्याचेही स्पष्ट करावे, अशी सूचना केली आहे.

26 दृश्यांवर कात्री लावण्याचा निर्णय
समितीने या चित्रपटातील 26 दृश्यांवर कात्री लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेव्हा आता पुन्हा एकदा पद्मावतीच्याच चर्चा सर्वत्र रंगल्या असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आलेले हे अडथळे पाहता येत्या काळात पद्मावतीत बदल केले जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.