मुंबई । राणी पद्मिनी यांच्या जीवनावर आधारित ’पद्मावती’ चित्रपटाला देशभरात जोरदार विरोध सुरु आहे. चित्रपटाला सुरू असलेल्या विरोधामुळे उद्भवलेल्या वादावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अखेर मौन सोडले आहे. ’निव्वळ अफवा आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ’पद्मावती’ला विरोध होत आहे. विरोधकांना वाटतंय तसं या सिनेमात आक्षेपार्ह काहीही नाही’, असे भन्साळी यांनीम्हटले आहे. भन्साळी यांच्या या खुलाशानंतर ’पद्मावती’वरून सुरू असलेला वाद थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संजय लीला भन्साळी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ’पद्मावती’ सिनेमावर घेतले जाणारे सर्व आक्षेप खोडून काढले आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टाने आणि जबाबदारीने मी हा सिनेमा बनवला आहे. राणी पद्मावतीच्या कथेमुळे मी प्रचंड प्रभावित आहे. हा सिनेमा म्हणजे पराक्रम आणि त्यागाला दिलेली मानवंदना आहे. मात्र, हा चित्रपट केवळ काही अफवांचा बळी ठरला आहे.
यात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात एक ड्रीम सिक्वेन्स दाखविण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. पण तसं काहीही नाही. याआधीही मी ही अफवा फेटाळली आहे. तसं लेखी लिहूनही दिलं आहे’, असे भन्साळी यांनी स्पष्ट केले आहे.
’कोणाच्याही भावना दुखावतील असे या सिनेमात काही नाही. राणी पद्मावती आणि अलाउद्दीन यांच्या दरम्यान कोणताही सिक्वेन्स दाखविण्यात आलेला नाही, असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकवार सांगत आहे. हा सिनेमा बनविताना राजपूतांच्या मान-मर्यादेचाही सन्मान राखण्यात आला आहे’, असेही त्यांनी सांगितले.
Prev Post