उपनगराध्यक्ष निवडीसाठी 17 रोजी विशेष सभेचे आयोजन 

0
भुसावळ :- भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी 17 रोजी विशेष सभा होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी विशेष सभेचे निर्देश दिले आहेत. विशेष सभेला भुसावळ तहसीलदार हे पीठासीन अधिकारी असतील. उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमधील राजकारण गतिमान झाले असून संधी कुणाला मिळते? याकडे लक्ष लागले आहे.
पालिकेचे उपाध्यक्ष युवराज लोणारी यांनी दिलेल्या पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याने या रिक्त जागेसाठी आता निवड प्रक्रिया होणार आहे. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नामनिर्देशन देणे व स्विकारण्याची मुदत राहणार आहे. यासाठी मुख्याधिकारी भुसावळ यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील तर यानंतर 11 वाजून 15 मिनिटांनी छाननी होईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची नावे यानंतर वर्णानुक्रमानुसार घोषित केली जातील. यानंतर 15 मिनिट माघारीची वेळ व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची नावे घोषित केली जातील. दरम्यान, सईदा बी.शेख, पिंटू कोठारी, रमेश नागराणी, सीए दिनेश राठी यांच्या नावाची चर्चा आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.