पनवेलमधील दरोड्यातील आरोपींचा भुसावळात शोध

0

डाऊन काशी एक्स्प्रेस अर्धा तास कसून तपासणी ; शेकडो पोलिसांची उपस्थिती

भुसावळ- नवी मुंबईतील पनवेल महामार्गावर व्यापार्‍याकडील सोने लुटून पसार दरोडेखोर हे काशी एक्स्प्रेसने पळून जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलास मिळाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जळगावपासून गाडीत बसून गुन्हेगारांचा शोध घेत होते तर भुसावळातही मंगळवारी दुपारी गाडी स्थानकावर आल्यानंतर तब्बल 30 मिनिटे गाडीची तपासणी करण्यात आली मात्र गुन्हेगार आढळले नाहीत.

एक चोरटा जाळ्यात ; चौघे पसार
पनवेल येथे सराफा दुकानात मंगळवारी पहाटे दरोडा टाकून पसार होणार्‍या पाच दरोडेखोरांपैकी एकास पोलिसांनी पकडले होते मात्र अन्य चौघे साथीदार सुमारे 170 ग्रॅम सोन्यासह पसार झाले होते. हे गुन्हेगार डाऊन काशी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत असल्याची माहिती राज्यातील पोलिस ठाण्यांना कळवण्यात आली शिवाय जळगाव पोलिस दलानेही ही बाब गांभीर्याने घेत नियोजन केले. नाशिक स्थानकापर्यंत गुन्हेगार याच गाडीत असल्याची पोलिसांनाही माहिती होती मात्र त्यानंतर त्यांचे लोकेशन कळू शकले नाही. भुसावळ रेल्वे स्थानकावर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या उपस्थितीत सुमारे अर्धा डझन अधिकारी व 100 पोलिसांनी गाडीची तपासणी केली.

सोने लुटीची माहितीनंतर पोलिस प्रशासन अलर्ट
संतोष मोतीलाल मुरकुंबी (वय 44, रा.नार्वे गल्ली, शाहपूर, बेळगाव, कर्नाटक) हे व्यापारी सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता 50 लाख 55 हजार रुपये किमतीचे सोने व दहा हजार रुपये रोख घेऊन बेळगावला जात असताना सायन-पनवेल महामार्गावर मॅकडनोल्ड हॉटेल समोरील थांब्यावरुन एका पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसला असता त्या कारमध्ये आधीच चार जण होते. एकाने दोन्ही हातांनी डोळे घट्ट दाबले तिघांनी बेदम मारहाण करीत ऐवज लांबविला होता. याबाबत अलर्ट जारी केल्यानंतर जळगाव डीवायएसपी सचिन सांगळे, भुसावळ येथील डीवायएसपी गजानन राठोड, एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे, रामानंदचे निरीक्षक बी.जी.रोहम, भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर, सागर शिंपी, रवींद्र बागुल तसेच शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी, एलसीबीचे कर्मचारी, आरपीएफचे निरीक्षक दिनेश नायर, व्ही.पी.त्रिपाटी, उपनिरीक्षक लवकुश वर्मा, जीआरपी पोलिस असा सुमारे 100 पोलिसांच्या ताफ्याने प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या काशी एक्स्प्रेसची तपासणी केली. दुपारी 2.20 वाजता आलेली गाडी 2 वाजून 50 मिनिटांनी रवाना झाली तर पहिल्या डब्यापासून ते शेवटच्या डब्यापर्यत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीतांचा शोध घेवूनही ते आढळले नाहीत.