पनवेलमध्ये भाजपची मुसंडी तर भिवंडीत काँग्रेस

0

पनवेल । पनवेल महापालिकेत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक झाली. त्यामुळे पनवेल महापालिका कोण काबीज करणार, याबद्दल मोठी उत्सुकता होती. भाजपने 78 जागांपैकी 51 जागांवर विजय मिळवत पनवेल महापालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर भिवंडीत काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. काँग्रेसला 90 पैकी 47 जागा मिळआल्या आहेत. मालेगावात मात्र त्रीशंकू परिस्थिती असून शिवसेना किंंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे.

महाआघाडीला अवघ्या 23 जागांवरच यश
पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारली असताना शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची मात्र घसरगुंडी उडाली आहे. महाआघाडीला अवघ्या 23 जागांवरच यश मिळवता आले आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला मात्र पनवेलमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी पनवेल महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमध्ये तीन सभा घेतल्या. त्याचाही मोठा फायदा भाजपला झाला.

शहरी आणि ग्रामिण भागातही भाजप प्रभावी
पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झाले होते. पनवेलमध्ये भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी लढत होती. भाजपला शहरी भागातून चांगले मतदान होईल, तर शेकाप महाआघाडीला ग्रामीण भागात चांगले यश मिळेल असा अंदाज होता. मात्र भाजपला शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपने पनवेल महापालिकेवर कब्जा केला.

भिवंडीत काँग्रेसला स्पष्ट बहूमत
भिवंडी भाजपयुक्त आणि काँग्रेसमुक्त असा नारा भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिला होता. मात्र आज प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर भिवंडी काँग्रेसयुक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. भिवंडी महापालिकेत काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला. भिवंडीत काँग्रेसने 90 पैकी 47 जागांवर विजय मिळवत कसाबसा बहुमताचा आकडा गाठला. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसला टक्कर दिली. भिवंडीत भाजपला 19 तर शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. समाजवादी पक्षाने 2 तर इतर पक्ष आणि अपक्षांना 10 जागांवर यश मिळाले आहे.

मालेगावमध्ये भाजपचे मुस्लिम कार्ड फेल
मालेगावसारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकले पण, मालेगावच्या मतदारांनी ते कार्ड धुडकावून लावले. मालेगावात काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या स्थानावर आहे. मात्र, कुणाच्याही हाती एकहाती सत्ता न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा पटकावल्या आहे. 28 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. शिवसेनेने 13 जागा जिंकत तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भाजप चौथ्या स्थानावर फेकला गेला. भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्यात. तर एमआयएमला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

भाजपने 27 मुस्लिम उमेदवार दिले होते
विशेष म्हणजे हिंदूत्वाचा अजेंडा राबवणार्‍या भाजपने मुस्लिमबहुल भागात मुस्लिम उमेदवारांना तिकिटांचे वाटप केले होते. इथे भाजपने एकूण 27 मुस्लिम उमेदवारांनी तिकिटांचे वाटप केले होते. यात 16 महिलांचा समावेश होता. परंतु, भाजपने खेळलेलं मुस्लिम कार्ड सपेशल अपयशी ठरले. विशेष म्हणजे भाजपने 56 उमेदवार दिले होते. त्यापैकी फक्त 9 उमेदवारच विजयी झाले. तर काँग्रेसने सर्वाधिक 76 उमेदवार दिले होते. एमआयएमने यावेळी मालेगाव निवडणुकीत उडी घेत 35 उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त 7 च उमेदवार विजयी झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या पारड्यात केवळ 3 जागांची भर पडली आहे. तर राष्ट्रवादीच्या 2 जागा घटल्या असून त्यांना 22 वरून 20 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने मागील निवडणुकीत भोपळाही फोडला नव्हता. मात्र यावेळी 9 जागा जिंकल्यात. तर मागील निवडणुकीत 2 जागा जिंकणार्‍या मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही.

भिवंडीत सपा-राष्ट्रवादी सोडले तर सर्व पक्ष स्वबळावर
भिवंडी महापालिकेसाठी काँग्रेसचे 65, भाजप + रिपाईचे 57, शिवसेनेचे 55, समाजवादी पक्षाचे 36, राष्ट्रवादी काँग्रेसचे 33, कोणार्क विकास आघाडीचे 16, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटचे 16 उमेदवार रिंगणात होते. यासोबतच 180 अपक्ष उमेदवारदेखील आपले नशीब आजमवत होते. भिवंडी महापालिकेत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. तर इतर सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत होते.