‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ला पुणेकरांची पसंती!

0

पुणे । वाढते प्रदूषण कमी करण्याबरोबरच कमी अंतराच्या प्रवासासाठी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) ने पुणे विद्यापीठात ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ योजना सुरू केली आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालये आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आपल्या परिसरात सायकल योजना सुरू करण्यासाठी स्मार्ट सिटीकडे विचारणा केली आहे. त्यात शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ तसेच खडकी आणि पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डाचा समावेश असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

महाविद्यालयांचा पुढाकार
स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने बाणेर-बालेवाडी या भागाची निवड केली आहे. स्मार्ट सिटीचे काम पाहणार्‍या पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीने या भागासाठी पब्लिक बायसिकल शेअरिंगचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत झूमकार (पीईडीएल) आणि ओएफओ या दोन कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. प्रायोगिक प्रकल्पांसाठी सुमारे 200 सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठात सुमारे 100 सायकली उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून प्रत्येक सायकलींच्या 8 ते 10 फेर्‍या होत आहेत. त्यामुळे ही योजना पुणेकरांच्या पसंतीस उतरत असतानाच आता ज्या महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मोठा आहे, तसेच वाहनांची संख्या अधिक आहे, अशा महाविद्यालयांकडून सायकल योजनेसाठी पुढाकार घेण्यात येत आहे.

आराखडा तयार करणार
पुणे विद्यापीठातील सायकल योजना सुरू झाल्यानंतर आता कृषी महाविद्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ तसेच खडकी आणि पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डाकडून योजना सुरू करण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आलेल्या मागणीनुसार, योजना राबविणे शक्य आहे का, तसेच त्यासाठी काय करावे लागेल? याचा आराखडा तयार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
– राजेंद्र जगताप
मुख्यकार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.