परंपरा खंडीत होऊ नये म्हणून सर्वपक्षीय गटनेत्यांची आज बैठक

0

नगरसेवक, आमदारांच्या मानधनातून भेटवस्तू

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची घोषणा

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याची परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे. मात्र, दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्यासाठी भाजप नगरसेवक, आमदारांचे मानधन देण्याची घोषणा सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली. तसेच, ही पंरपरा सुरू ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय असून महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची आज  बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू होती. मात्र यावर्षी खंडीत होणार असे वाटून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून ही भेटवस्तू द्यावी, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली होती.

यंदा परंपरा खंडीत होणार का?
आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी भेटवस्तू देऊन सन्मान केला जात होता. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर नितीन काळजे यांनी सूचना करूनही प्रशासनाने या खरेदीबाबत प्रक्रिया केली नाही. त्यांच्याकडून उत्सव, महोत्सवावरील पालिका तिजोरीतून खर्च करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्बंध आल्याचे कारण देण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपच्या काळात ही पंरपरा खंडीत होत असून भाजप पदाधिकारी नास्तिक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला होता. तसेच, नगरसेवकांच्या मानधनातून भेटवस्तू देण्याच्या सूचना दिली होती.

आळंदीतून भेटवस्तू न देण्याची सूचना
या आरोपानंतर प्रत्युत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवक, आमदारांच्या मानधन वापरून त्यातून वारकर्‍यांना भेटवस्तू देण्याची ही परंपरा कायम ठेवू, असे जाहीर केले. एकनाथ पवार म्हणाले की, वारकरी, तसेच देहू व आळंदी संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी भेटवस्तू न देण्याची सूचना केली आहे. त्यांनी आम्हाला फक्त चांगल्या सेवा-सुविधा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा अधिक चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्यावर महापालिकेचा भर आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे भेटवस्तू देता येत नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही आमदार, सर्व नगरसेवकांची वारक-यांना भेटवस्तू देण्यासाठी मानधनाची रक्कम देण्याची तयारी आहे. तसेच, सर्वपक्षीय नगरसेवक देखील त्याला तयार असल्यास या मानधनाच्या रकमेतून भेटवस्तू दिली जाईल. त्यासाठी सोमवारी महापालिकेत गटनेत्यांची बैठक होणार आहे.