परदेशी उच्च अधिकार्‍यांनी केले लोकहिताय कामांचे कौतुक!

0

नवी मुंबई । हुडको या मानांकित संस्थेच्या वतीने नागरी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध देशातील प्रशासकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारद, नगर नियोजन, शास्त्रीय संशोधन, पर्यावरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणा-या 17 पुरुष व 6 महिला अधिकारी अशा 23 उच्च अधिका-यांच्या अभ्यास गटाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन अत्याधुनिक कार्यप्रणालीचे व नियोजनबद्ध नागरी सुविधा प्रकल्पांचे कौतुक केले. या 23 जणांच्या अभ्यास गटाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या अधिका-यांशी सुसंवाद साधत त्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी नवी मुंबई महानगरपालिकेविषयी महत्वपूर्ण माहिती त्यांना दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने राबवली जाणारी कार्यप्रणाली अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करत अभ्यास गटातील अनेक अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारींचे विहीत वेळेत निराकरण करणार्‍या ’ऑनलाइन ई-तक्रार निवारण प्रणालीचे’ कौतुक केले. अनेकांनी अशी प्रणाली आपल्याही देशात राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

17 पुरुष व 6 महिला अधिकारी यांच्या अभ्यास गटाची भेट
इ.टी.सी. केंद्रातील विविध कक्षांना भेट देऊन या अभ्यास गटातील परदेशी पाहुण्यांनी तेथील शिक्षण प्रशिक्षण पद्धतीची पाहणी केली व इ.टी.सी. संचालक डॉ. वर्षा भगत यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नागरी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावरील हुडकोच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विविध देशातून आलेल्या 23 अधिकार्‍यांच्या अभ्यास गटाने हुडकोच्या प्रकल्प महाव्यवस्थापक डॉ. सुकन्या घोष व उप महाव्यवस्थापक संतोष देवगिरीकर यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यास भेट दिली. या अभ्यास गटात हुडकोचे कार्यक्रम सहाय्यक ज्ञानेश्‍वर चौधरी यांच्या निरीक्षणाखाली निमतुल्ला हामीदे (अफगाणिस्तान), मोहम्मद फाथी अबुदलाईद (इजिप्त), गेटनेट अमारे (इथिओपिया), तिजिस्ते ताये (अथिओपिया), हुसन मोहम्मद इब्राहम (इराक), वालिद खालीद मुस्ताफा (इराक), सेसा विल्यम रामैसा (लेसोथो), झुझेनी लेमानी (मलावी), अब्दोऊ मौसा (निगरे), गाना जॉन इत्सुआन (नायजेरिया), अहमद मोहम्मद हुसैन (सोमालिया), डॉन सुमीथ नंदना समरतुंगे (श्रीलंका), वासंथी नयना विक्रमरत्ने (श्रीलंका), शेमा हुसैन (सुदान), माहेर इब्राहम (सिरीया), राधाद ताराबिशी (सिरीया), रिम युसेफ (सिरीया), हमिशी सुदी (टांझानिया), फिगाचे इमॅन्युल पॉल (युगांडा), गॉडफ्रे अलुन्झी (युगांडा), थॉमस नादोरो (झिम्बावे), सिबेकेझेले नल्डोयू (झिम्बावे) अशा परदेशी अभ्यासक अधिकार्‍यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची सविस्तर माहिती जाणून घेतली. नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेले काम हे लोकांना नजरेसमोर ठेवून केले जात असून नागरिकांना कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचे व त्यामध्ये आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सतत सुधारणा करण्याचे महानगरपालिकेचे धोरण अनुकरण करण्यासारखे आहे, असे मत अभ्यास गटातील विविध देशांच्या अधिकारी प्रतिनिधींनी व्यक्त करून यामुळे भारत देशाच्या प्रगतिशील वाटचालीची चांगली प्रतिमा मनात उमटल्याचे सांगितले.