पाचोरा : भरधाव वेगाने जाणार्या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्या जेसीबीचा कट लागल्याचा प्रकार शनिवारी परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडला. या घटनेने रेल्वे चालकाने दाखवलेल्या सतर्कतेने अपघात टळला.
जेसीबीचा कट लागला
कामाख्याहुन लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रमांक अप 12520) ही जळगाव स्थानकावरुन शनिवार, 4 जुन रोजी सकाळी 10.23 मिनिटांनी रवाना झाली. दरम्यान पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक (रेल्वे कि.मी. क्रंमाक 379 / 8) रेल्वे लाईन लगत रेल्वे रुळाखाली बसविण्यात येणारे सिमेंटचे ब्लॉक जे. सी. बी.च्या सहाय्याने ठेवण्याचे काम सुरू होते. यावेळी कामाख्या एक्स्प्रेस भरधाव वेगाने जात असतांना सदर जे. बी. सी. चा पुढील भाग कामाख्या एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या निदर्शनास येताच लोकोपायलट ने हॉर्न वाजवुन सूचना दिला. मात्र याकडे जेसीबी चालकाने दुर्लक्ष केले. यामुळे भरधाव वेगाने येणार्या कामाख्या एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या बाजुच्या चाकाजवळ जेसीबीचा पुढील भाग धडकला.
प्रवाशांमध्ये घबराट
मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जेसीबीला रेल्वेने काही अंतरावर फरफटत नेले. लोकोपायटलने गाडी कंट्रोल करत थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ मात्र निश्चित टळला. कामाख्या एक्स्प्रेसला घटनास्थळी सुमारे एक तास खोळंबा झाल्यानंतर जेसीबी बाजुला हटविल्यानंतर धीम्या गतीने पाचोरा रेल्वे स्थानकावर दुपारी 12 वाजुन 53 मिनिटांनी प्लॅट फार्म क्रमांक एकवरील लुप लाईननवर गाडी थांबवण्यात आलीव व भुसावळ येथुन दुसर्या इंजिनला बोलावण्यात आले. भुसावळहुन इंजिन आल्यानंतर क्षतीग्रस्त झालेले इंजिन बाजुला करुन कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना करण्यात आली.