परप्रांतीय ट्रक चालकास नशिराबादजवळ लुटले ; जळगावातील आरोपी जाळ्यात

0

सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांनी लावला काही तासात आरोपींचा छडा

भुसावळ- भुवनेश्‍वर (ओरीसा) येथे जात असलेल्या ट्रक चालकाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील महिंद्रा शोरूमजवळ तीन अज्ञात तरुणांनी रीक्षा रस्त्यात आडवी लावून लुटल्याची घटना 17 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी 19 रोजी सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासात जळगावातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरू असून त्यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

या आरोपींना केली अटक
ट्रक चालक परविंदरसिंग सुखदेवसिंग (नेहरूनगर, पूर्व भिलाई, जि.दुर्ग, छत्तीसगड) हे नाशवंत कांदा नाशिक येथून भुवनेश्‍वर कडे नेत असताना अज्ञात आरोपींनी 17 रोजी पहाटे पाच वाजता लुटत एक हजारांची रोकड व आठ हजारांची मोबाईल लांबवला होता. आरोपींनी गुन्ह्यात विना क्रमांकाच्या रीक्षाचा वापर केला होता. कांदा नाशवंत असल्याने परविंदर सिंग यांनी आधी मालाची डिलेव्हरी केल्यानंतर 19 रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सहाय्यक निरीक्षक धारबडे यांनी कर्मचारी खरात, हवालदार राजु साळुंखे, पोलीस नाईक युनूस शेख, चेतन पाटील, गुलाब माळी, हेमंत मिटकरी यांना सोबत घेत अवघ्या काही तासात जळगावातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संशयीत आरोपी विशाल विक्रम भोई (18, वाल्मीक नगर, जळगाव), बंटी नंदू महाले (19, खंडेराव नगर, जळगाव), संदीप उर्फ गोलू जयसिंग सोनवणे (18, चौगुले प्लॉट, शनीपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.