मनोनिग्रह व्याख्यानमालेत स्वामी सरस्वती यांचे प्रतिपादन
पिंपरी : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे रहस्य उलगडून दखविले आहे. परिपूर्ण अवस्थेला जाण्यासाठी मनाच्या शक्तीबद्दल सांगितले आहे. साधकाला साधना करताना अध्यात्माच्या परमोच्च शिखरावर जायचे असेल तर त्यासाठी मन हेच साधन आहे. माणूस बाह्यरंगाने यशस्वी होऊ शकत नाही. कारण तो भावनांचा गुलाम झालेला असतो. मन, बु÷द्धी आणि शरीराचा बॅलेन्स गेल्यावर कर्माचा बॅलेन्स संपतो, असे मत श्रुतीसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद महाराज सरस्वती यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मनोनिग्रह या सहा दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शीतल शिंदे, रवी लांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी, माणिकराव अहिरराव, उद्योजक सुरेश बोरूडे आदी उपिस्थत होते.
हीच यशाची गुरूकिल्ली
स्वामी स्वरूपानंद महाराज पुढे म्हणाले की, मनाची एकाग्रता ही यशाची गुरूकिल्ली असते. मनाला आवर घालून स्थिर करायला हवे. शरीरावरील बॅलेन्स गेल्यावर आपण अशा अवस्थेत गेलेलो असतो की आपण काय करतो हेच अनेकांना समजत नाही. श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनाचा दुरुपयोग करू नये. असे केले तर हेच मन जीवनाचे अधःपतन घडून आणते. सुरेश वाडकर, अतुल राऊत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.