आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : भारतामध्ये पारंपरिक चिकित्सेने लोकांचे स्वास्थ्य निर्माण व्हावे या हेतूने भारत सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. आयुर्वेद, योग, युनानी, होमियोपथी, सिद्ध या वैद्यकीय चिकित्सा प्रणाली यामध्ये असून त्यांच्या सहाय्याने राष्ट्रीय स्वास्थ्य कसे जोपासले जाईल याचे धोरण भारत सरकार राबवित असून ते यशस्वी देखील होत आहे. लोकांना परवडतील असे औषधोपचार देण्यामागे आयुष मंत्रालय भर देत आहे, अशी माहिती आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
जगभरातील 560 संशोधक सहभागी
पिंपरी येथील डॉ .डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र यांच्यावतीने रविवारपासून ‘स्वास्थ रक्षणासाठी आयुर्वेद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाईक बोलत होते. परिषदेत जगभरातील आरोग्यतज्ञ, संशोधक, विद्यार्थी असे एकूण 560 जण सहभागी झाले आहेत. रविवारी विविध विषयांवर देश विदेशातील 20 तज्ञ डॉक्टर्सनी शोधनिबंध सादर केले. तर 21 भित्तिपत्र सादरीकरण केले. भारतातील 7 औषधी निर्माण संस्था या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्व
नाईक म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने देश विदेशातून या परिषदेसाठी संशोधक सहभागी झाले आहेत यातूनच आयुर्वेदाचे महत्त्व कळते. परिसंवादातून समाजामध्ये आयुर्वेदाच्या उपयोगातून स्वास्थ्य निर्मिती व्हावी आणि त्याचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व्हावा हा उद्देश असून कुपोषणासारख्या समस्यांवर देखील काम व्हावे. प्रत्येक देशाची पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा आहे. त्यामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका हे देश अग्रेसर आहेत. आयुर्वेदीय पारंपरिक वैद्यकीय चिकित्सेच्या मदतीने स्थानिक औषधी वनस्पतीची लागवड व संरक्षण होणे महत्वाचे आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन तर धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा साजरा केला यावरून आयुर्वेदाचे महत्व जागतिक स्तरावर प्रामुख्याने दिसत आहे. स्वास्थ्यरक्षणासाठी आयुष कार्यरत आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी डॉ. पी. एन. राझदान (कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी), डॉ. सोमनाथ पी. पाटील (सेक्रेटरी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे), जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील), डॉ. बी. पी. पांडे (माजी प्राचार्य, आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी), डॉ. डी. डी. पाटील (संचालक, आयुर्वेद), डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष, इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ आयुर्वेद) डॉ. सुनंदा रानडे (उपाध्यक्षा, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे), डॉ. गुणवंत येवला (कायचिकित्सा, विभाग प्रमुख आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी), जोआकविम जॉर्ज (अध्यक्ष, आयुर्वेद असोसिएशन, पोर्तुगाल) व डॉ. मंदार बेडेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्मृतिका तावरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ दिपंकर दिगंबर यांनी केले.
विविध विषयांवर व्याख्याने
परिषदेमध्ये स्वास्थरक्षणासाठी आयुर्वेद याबाबत महर्षीं महेश योगींचा दृष्टिकोन या विषयी डॉ. रॉबर्ट श्नायडर (अमेरिका), महिलांचे आरोग्य आणि हार्मोनल असंतुलन या विषयी डॉ. नीलिमा (बनारस विश्वविद्यालय), डॉ. स्वाती मोहिते, सार्वजनिक आरोग्यात आयुर्वेद आत्मसात करणार्या ब्राझिलियन लोकांचे अनुभव कथन डॉ. जोस रुगे. ऑटोइम्युन डिसऑर्डर या विषयी डॉ. एस. गोपकुमार व डॉ. जी. जी. गंगाधरण. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे विकार या विषयी डॉ. रोहित साने. बदलती जीवन शैली आणि पचनासंबंधीचे विकार या विषयी डॉ.व्ही.एल.श्याम. मज्जातंतू आणि मस्तिष्क संस्थेमधील विकार या विषयी डॉ.मंगेश देशपांडे, डॉ. अनिल पाटील. रोगास प्रतिबंध करण्यासाठी न्यूट्रस्युटिकल्स या विषयी डॉ. रणजित पुराणिक. दुग्धपदार्थांचे उपयोग या विषयी डॉ.अमोद साने. त्वचा विकार टाळण्यासाठी आयुर्वेदीय आहार व जीवनशैली या विषयी डॉ.गौरांग जोशी. आयुर्वेदाद्वारे कर्करोगास प्रतिबंध या विषयी डॉ. सुकुमार सरदेशमुख तसेच डॅनियला फेनिक (रोमानिया) व जोवाक्वीम जॉर्ज (पोर्तुगाल) हे स्वस्थरक्षणासाठी आयुर्वेद या विषयी मत व्यक्त केली.