पुणे : पाण्याचा पुनर्वापर करून शाळेतील मुलांना पोषण आहार देण्याचा कौतुकास्पद उपक्रम जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील जिल्हा परिषद शाळेने राबविण्यास प्रारंभ केला असून, हा उपक्रम पंचक्रोशीतील नागरिकांच्याही चर्चेचा विषय ठऱला आहे.
राज्यात शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची योजना राबव्यात येत आहे. या योजनेबाबत अनेक भले- बुरे अनुभव कथन केले जातात. मात्र, कल्पकतेची जोड दिल्यास एखादी योजना कशी वेगळी ठरू शकते, याचे उदाहरण निमगाव सावातील शाळेतील शिक्षकांनी घालून दिले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक पोषण आहार मिळावा म्हणून पाण्याचा पुनर्वापर या संकल्पनेतून शाळेच्या पाठीमागील आवारात परसबाग फुलविली आहे. या परसबागेत वांगी, मिरच्या, वालवड, गवार, पालक, धना अशा विविध प्रकारच्या भाजीपाला रोपांची लागवड करण्यात आली आहे. या भाजीपाल्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे कमी पाण्यावर अधिक उत्पादन कसे घेता येते, याची प्रचिती मुलांना आली. याच परसबागेत तयार झालेल्या भाजीपाल्याचा वापर पोषण आहारासाठी केला जात असल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण लांडे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाकीर पटेल यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी बनविलेली ही परसबाग पाहण्यासाठी रोज अनेक पालक येतात. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगावर ते कौतुकाची थापही देतात. या विद्यार्थ्यांची यशोगाथा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनाही समजल्यामुळे या पदाधिकार्यांसह अन् क्षेत्रांतील लोकही निमगाव सावाच्या शाळेला भेट देण्यासाठी आवर्जुन येऊ लागले आहेत. अन्य ठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी हा आदर्श घ्यावा, अशी भावनाही हे मान्यवर व्यक्त करत आहेत.