चिखलीतील बापलेकाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : गृहकर्जासाठी लागणारे कागदपत्रे बनावट तयार केली. त्याआधारे एका राष्ट्रीय बँकेतून 20 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज काढले. ज्याच्या नावावर कर्ज काढले त्याच्या परस्पर सर्व रकमेचा अपहार केला. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात बाप आणि मुलगा या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधन अशोक वाघ (वय 28, रा. संभाजी चौक, प्राधिकरण, निगडी) या तरुणाने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विठ्ठल शंकरराव लोणकर, सचिन विठ्ठल लोणकर (दोघे रा. केशवनगर बस स्टॉप समोर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
अनेकांच्या नावावरही घेतले लाखोचे कर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशोधन यांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही. तरीही आरोपींनी यशोधन यांच्या नावाने पंचवटी डेव्हलपर्सचे बनावट मोर्गेज परवानगीपत्र तयार केले. त्यातील मजकूर, शिक्का आणि सही या सर्व बाबी बनावट केल्या. त्याआधारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून 20 लाख 20 हजार रुपयांचे गृहकर्ज काढले. तसेच आरोपींनी अन्य सहा जणांच्या नावावर अॅक्सिस बँक मुंबई, एचडीएफसी बँक शाहूनगर, एलआयसी हाउसिंग फायनान्स पिंपरी, महाराष्ट्र बँक आकुर्डी मधून लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. त्या सर्व रकमेचा आरोपींनी अपहार केला आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.