पराठा विक्रेत्या महिलेने स्वतःला मारले ब्लेड

0

जळगाव । शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध भागातील अतिक्रमण काढण्याची कारवाईस सुरूवात झाली आहे. मागील 15 दिवसांपासून महापलिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेली लोटगाडी घेवून जात असतांना महिलेस पालिका कर्मचार्‍यांनी विरोध केल्याने तीने स्वतःला ब्लेड मारून घेतल्याने जखमी झाली आहे. तर तीला रोखणार्‍या दोन महिला कर्मचार्‍यांना देखील ब्लेड लागले. महापालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

परस्पर विरोधी गुन्हा दाखल
जप्त साहित्य परत घेण्यासाठी आलेल्या महिलेने महापालिका आवारात स्वतःला ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत दोन महिला कर्मचारी देखील जखमी झाल्या. ही घटना घडली तेव्हा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार देखील तेथे उपस्थित होते. या महिलेविरोधात तत्काळ गुन्हा दाखलचे आदेश उपायुक्तांनी दिले. यानुसार शहर पोस्टेला कर्मचारी माया गोयल यांनी मोना पवार विरुध्द गुन्हा दाखल केला़ मोना पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्मचारी माया गोयर, लक्ष्मी जावळे, सुनिता सोनवणे, रहेनाबी शेख तस्लीम विरुध्द परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला.

‘नो हॉकर्स झोन’मधील कारवाई
अतिक्रमण निर्मुलन कारवाईसाठी महापालिकेच्या कर्मचार्‍यांसोबतच मक्तेदाराचे कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या कारवाईत मुख्यतः‘ नो हॉकर्स झोन’मध्ये उभे राहणार्‍या हॉकर्संवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईत हॉकर्स साहित्य जप्त करण्यात येत असून ते सर्व साहित्य महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात ठेवण्यात येत आहे. अतिक्रमण निर्मुलन मोहिम सुरू झाल्यापासून दररोज कर्मचारी व हॉकर्संमध्ये किरकोळ वाद होत आहे. तर जप्त केलला माल परत मिळावा यासाठी हॉकर्स महापालिकेत चकरा मारतांना दिसत आहेत.

असा घडला प्रकार
शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाच्या मोहिमचे साहित्यसह जप्ती अवैध बांधकाम काढण्याचे काम सुरु आहे. दररोज अतिक्रमण विभागाकडून विविध साहित्य, तसेच खाद्यपदार्थाची जप्तीची कारवाई सुरु आहे. दररोजच्या साहित्य जप्तीने मनपा आवारातील पार्किगीची जागा भरलेली आहे. तसेच काही साहित्य गोडावून नेण्यात येत आहे. जप्त केलेले साहित्य प्रभारी आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणाला अतिक्रमण विभागातर्फे दिले जात नाही. परंतु, महापालिकेत रोज आपले साहित्य पुन्हा मिळेल या आशेने हॉकर्स धाव घेत आहेत. यात गायत्री कैलास पवार राहणार तुकारामवाडी या महिलेचा गणेश कॉलनीच्या आवारात पराटा खाद्यपदार्थाचा व्यवसाय आहे. अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांनी महिलेची लोट गाडी जप्त करुन मनपाच्या आवारात ठेवली आहे.

घडलेल्या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण
गायत्री पवार ही महिला मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांची अतिक्रमण विभागाने जप्त केलेली लोटगाडी घेण्यासाठी आली. परंतु, अतिक्रमण विभागाने लोटगाडी देण्यास नकार दिल्याने तसेच आपली लोटगाडी स्वतः मनपातून ओढून नेत असतांना अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांनी विरोध केला असता स्वतः या महिलेने अंगावर ब्लेड ओढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला मनपा कर्मचारी महिला आवरण्यासाठी केले असता यात माया गोयर व लक्ष्मी जावळे यांना ब्लेड लागलेल आहे.

हॉकर्सची आयुक्तांना शिवीगाळ
सकाळी महापालिकेत महिला हॉकर्सचा आत्महत्येचा प्रकार घडल्यानंतर बळीरामपेठेतील वखारी जवळील काही हॉकर्संनी प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांना शिवीगाळ केली असा आरोप अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात आला. याप्रकाराबाबत शनिपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत होता. परंतु संबधीत हॉकर्संना समज देवून सोडून देण्यात आले. पुन्हा असा प्रकार घडू नये अशी तंबी शनीपेठ पोलिसस्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रविण वाडीले यांनी दिली आहे.