जळगाव : कुरुक्षेत्रानंतर राजघराणे आणि कृषी संस्कृती यामधील परस्पर विरोधी नियम आणि जगण्याची पध्दत यामधून दोन वेगळया संस्कृतीमधील फरक अभिवाचनाद्वारे परिवर्तनच्या कलावंतांनी विद्यापीठातील अभिवाचन महोत्सवात सादर केला, तेव्हा प्रेक्षकांनी या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेच्या वतीने सोमवार पासून परिवर्तन नाटयसंस्थेच्या सहकार्याने तीन दिवसाचा अभिवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला. आज मंगळवारी महाश्वेता देवी यांच्या `कुरुक्षेत्रानंतर ` या कादंबरीचे अभिवाचन करण्यात आले. उत्तरा या महिलेच्या पोटात वाढणारा गर्भ हा पांडवांचा एकमेव वारसदार. विधवा झालेल्या मात्र लहान असलेल्या उत्तरेच्या दु:खी मनाला जनपदातून आलेल्या पाच महिला एक वेगळे जग तिच्या समोर घेवून येतात.
राजघराण्याचे आणि कृषी संस्कृतीचे परस्पर विरोधी नियम व जगण्याची पध्दत यातून दोन वेगळया संस्कृतीचा फरक या कादंबरीत उलगडून दाखविण्यात आला आहे. अनुषा महाजन यांच्या गाण्याने अभिवाचनात रंगत अधिक वाढली तर मंजूषा भिडे यांची कुंती, रेखा महाजन यांनी सादर केलेली विशादीन यांच्यातील संघर्ष प्रेक्षकांना अधिक भावला. सशक्त अभिनयाने या अभिवाचनाची रंगत वाढत गेली. यामध्ये डॉ.रेखा महाजन, मंजूषा भिडे, मानसी जोशी, जयश्री पाटील, अनुषा महाजन, हर्षदा पाटील, राणी चव्हाण,मोना खरे यांनी भाग घेतला. दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे होते. सोनाली पाटील व सुनिता दप्तरी यांची निर्मिती आणि मोना तडवी यांची प्रकाश योजना होती. उदया या अभिवाचनाचा समारोप दि.बा.मोकाशी यांच्या पालखी या कांदबरीच्या अभिवाचनाने होणार आहे.