जळगाव। परिवर्तनाची धुरा खांद्यावर घेणार्या ‘सावित्री’ आजच्या देशाच्या आधारस्तंभ आहेत असे रायगड जिल्ह्यातील पेण येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब जळगाव तर्फे गणपती नगर मधील रोटरी हॉल मध्ये आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्ष नित्यानंद पाटील व मानद सचिव विजय जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सेझ प्रकल्पाला महिलांचा विरोध
चाकोरीबद्ध जीवनाच्या विरोधात संघर्ष करण्याची मानसिकता ग्रामीण भागातील महिलांमध्ये जास्त आढळते. ठेकेदाराच्या हाताखाली काम करणारी सामान्य महिला सखुबाई वाघमारे बचतगट चळवळीत येऊन प्रमुख होते. पुढे सामाजिक काम करीत गावाची सरपंच होते. केवळ स्त्रीयांसाठी नाही तर पुरूषांसाठी आधार ठरते अशी आधुनिक सावित्रीची यशोगाथा पाटील यांनी सांगितली. मुकेश अंबानीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘सेझ’ प्रकल्पांविरोधात आमच्या महिलांनी बंड पुकारले. महिलांना ध्वजारोहणाचा अधिकार मिळाला म्हणजे पाळण्याच्या दोरीपासून तिरंग्याच्या दोरीपर्यत महिलांची वाटचाल झाली आहे असेही त्या म्हणाल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेवढे नागरिकांना शहीद व्हावे लागले त्यापेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. शेती आणि शेतकर्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यावर विचार करण्याची गरज शेवटी त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रारंभी परिचय प्रा.डॉ.शुभदा कुळकर्णी यांनी तर आभार डॉ.प्रदीप जोशी यांनी मानले.