पुस्तक प्रकाशन सोहळ्या व्यक्त केले मत
पिंपरी : परिवर्तन हा समाजाचा स्थायिभाव असला पाहिजे. अहंकार आणि न्यूनगंड या दोन्ही बाबी टाळून वास्तवाचे दर्शन लेखनातून व्हावे, असे मत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. चिंचवड येथे ज्येष्ठ साहित्यिक विलास राजे लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित शब्दरूप हा चारोळीसंग्रह, भावस्पर्श हा कवितासंग्रह, प्रजापती कुंभार हे संकीर्ण, चैतन्याचा जिव्हाळा हा लेखसंग्रह, झिपरी ही कादंबरी, असे घडले पुणे हे संकीर्ण, माणसं मराठी मुलखातली हे संकीर्ण आणि कथाकलश हा कथासंग्रह अशा आठ पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त डॉ. लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिज्जत पापड उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ह.भ.प. रायबा गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, कृष्णकांत ढाणे, प्रकाशक नितीन हिरवे, विलास राजे, संजय राजे आदी उपस्थित होते.
लेखनाचा उत्तम वस्तुपाठ
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले की, बहुश्रृतता, व्यासंग यातून वस्तुनिष्ठ लेखनाचा उत्तम वस्तुपाठ विलास राजे यांच्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून प्रदर्शित होतो. वैचारिक आणि ललित लेखनाचा योग्य समन्वय राजे यांनी साधून लेखनातील आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. अर्थात कोणताही साहित्यिक-कलावंत हा परिपूर्ण नसतो. आपल्या निर्मितीत जे न्यून राहते त्याच्या असमाधानातून प्रतिभावंत हे नवनिर्मितीचा ध्यास घेतात. विलास राजे यांची झिपरी ही कादंबरी एखाद्या वेगवान चित्रपटाप्रमाणे उलगडत जाते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, आताच्या काळात जात आणि धर्म माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण करत असताना विलास राजे माणुसकीची मूल्ये आपल्या लेखनाद्वारे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. मध्ययुगात ग्रामीण भागात जातनिहाय अर्थव्यवस्था आणि जगण्याचे नियम ठरलेले होते. भावनेच्या आहारी न जाता किंवा कोणाचाही उपमर्द न करता मार्मिक लेखन करणे हे विलास राजे यांचे लेखन वैशिष्ट्य आहे.
कृष्णकांत ढाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशक नितीन हिरवे मनोगत व्यक्त केले. कवयित्री मानसी चिटणीस यांनी विलास राजे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या पुस्तकांमधील कविता, पोवाडा आणि निवडक उतार्यांचे वाचन केले. यावेळी विलास राजे मित्रपरिवार, कुंभश्री मित्रपरिवार, साहित्य संवर्धन समिती, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, शब्दधन काव्यमंच, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आणि प्रदीप गांधलीकर आदी उपस्थित होते. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सविता इंगळे यांनी आभार मानले.