परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात 143 कोटींची तरतूद

0

नवी मुंबई । परिवहन उपक्रमाचा,सन 2018-19 चा मूळ 333 कोटी 11 लक्ष 74 हजार जमा व 333 कोटी 04 लक्ष 99 हजार खर्चाचा आणि 6 लक्ष 75 हजार शिलकीचा अर्थसंकल्प व सन 2017-18 चा 247 कोटी 74 लक्ष 23 हजार जमा आणि 247 कोटी 69 लक्ष 48 हजार खर्च व 4 लक्ष 75 हजार शिल्लक रक्कमेचा सुधारित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस यांना सादर केला.

वाशी से.9 येथील बस टर्मिनस व रबाळे आगार मनपाच्या निधीतून
या अर्थसंकल्पात वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाकडून जनतेस प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उच्च तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक सुविधासह विद्युतवर (इलेक्ट्रीक) चालणार्‍या आणि डिझेलवर चालणार्‍या एकूण 40 बसेस या आर्थिक वर्षात खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासन व सिडको लि. यांचेकडून नवी मुंबईतील बांधकामास 1.5 चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आला आहे. त्यामूळे उपक्रमाच्या ताब्यात असलेले वाशी से.9 येथील बस टर्मिनस व रबाळे आगार व्यापारी तत्वावर महानगरपालिकेच्या निधीतुन विकसित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या MORTH च्या आर्थिक साहाय्याने रबाळे आगार येथे अत्याधुनिक सेवासुविधा सह असे चालक प्रशिक्षण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे. ITS प्रकल्प अंतर्गत National Common Mobility Card या प्रणालीद्वारे बसेसचे तिकीट/ पास/ Online व्यवहार करणे शक्य होणार असे Smart Card उपलब्ध करुन देणे. ITS प्रणालीद्वारे उपक्रमांच्या सर्व बसमार्गावर नियंत्रण करुन प्रवाशांशी सुसंवाद साधणे, तसेच बसच्या फेरीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे. ITMS प्रणालीमधून मोबाइल अ‍ॅपद्वारे मोबाइल तिकिटिंगची योजना सक्षमपणे कार्यान्वीत करणे या आर्थिक वर्षात नियोजित आहे. बस खरेदी, टर्मिनस विकास व इत्यादी कामासाठी लागणारा निधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान स्वरुपात प्राप्त होणार आहे. यासाठी सन 2018-19 च्या परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात रु.143 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.