परिस्थितीला कंटाळून एकाच कुटुंबातील तीन बहिणी, एका भावाची आत्महत्या

0

फरीदाबाद : हरयाणा येथील सुरजकुंड भागात एकाच कुटुंबातील तीन बहिणींनी आणि एका भावाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरजकुंड भागातील दयाळबाग भागात यांचं घर आहे. हे घर त्यांनी किरायाने घेतले होते. परिस्थितीला कंटाळून या सगळ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती मिळते आहे. या चौघांचे मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन वेगवेगळ्या रूममध्ये या सगळ्यांनी आत्महत्या केल्याचीही माहिती समोर आली आहे.

आत्महत्या का करण्यात आल्याची माहिती घेणे सुरु असून आम्ही सगळ्या बाजूंचा विचार करून तपास करतो आहोत असे पोलिसांनी सांगितले आहे. या इमारतीच्या केअरटेकरने फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची बाब समोर आणली तेव्हा हा आत्महत्यांचा प्रकार समोर आला असेही पोलिसांनी सांगितले आहे. या चौघांनाही आर्थिक चणचण भासत असल्याने आत्महत्या केल्याची सुसाइड नोट मिळाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या चौघांची वयं ३७ ते ५२ च्या घरात आहेत. मीना मॅथ्यू वय ५२ वर्षे, नीना आणि जया यांची वयं अनुक्रमे ५१ आणि ४९ अशी आहेत. तर प्रदीप हा या तिघींचा भाऊ असून त्यांचं वय ३७ होतं अशीही माहिती आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चौघेही आर्थिक अडचणीत होते. सहा महिन्यांपासून या चौघांनीही शेजाऱ्यांकडून पैसे उधार घेतले होते अशीही माहिती पोलिसांनी दिली.