परीक्षेला कॉप्या नव्हे तर आईस्क्रीम देण्यासाठी प्रियकराची धडपड

0

जळगाव -इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. शिक्षण विभागाने कॉपी मुक्त परीक्षेचा मोठा गाजावाजा केला असला तरी इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला जळगाव शहरासह जिल्हाभरातील बहुतांश केंद्रावर कॉप्याचा पाऊस पडला. दरम्यान, जिल्ह्यातील 14 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली. पारोळा 10, चाळीसगाव 3 तर कोळगावला एकावर कारवाई
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली. जिल्ह्यातील 71 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असून 51 हजार 572 विद्यार्थी परीक्षा देत आहे. आज इंग्रजी भाषेच्या पेपरला पहील्याच दिवशी कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील कोळगाव येथील माध्यमिक विद्यालयात 1, चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयात 3 तर पारोळा येथील किसान महाविद्यालयात 10 असे एकूण 14 कॉपीबहाद्दरांवर भरारी पथकाने कारवाई करून त्यांना डिबार केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.

राज्यभरात बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाली जिल्ह्यामध्ये 71 केंद्रांवर सुमारे 51 हजार 572 हजार विद्यार्थी पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला सामोरे गेले. गुरुवारी सकाळी 11 ते 2 या तीन तासात इंग्रजीचा पेपर झाला. जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय, अ‍ॅग्लो उर्दू हायस्कूल, बबन बाहेती महाविद्यालय, सिध्दी विनायक महाविद्यालय अशा पाच केंद्रावर परिक्षा पार पडली.

केंद्राच्या प्रवेशाव्दारावरच कसून तपासणी
प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. परिक्षेच्या अर्ध्या ते एक तासापूर्वी केंद्रात प्रवेश करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास केंद्रावर हजर झाले होते. केंद्राच्या प्रवेशव्दारावरच केंद्रप्रमुख तसेच कर्मचार्‍यांतर्फे विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींची कसून तपासणी करण्यात आली. मोबाईल, खिशातले पाकिट यासह इतर वस्तू प्रवेशाव्दारावरच जमा करण्यात आल्या होत्या. लिहावयाचे पॅड घेवून जाण्यासाठी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी वाद घातला. मात्र तेही जमा करण्यात आले.

या केंद्रावर सर्रास कॉफ्या
शहरातील नूतन मराठा महाविद्यालय अ‍ॅग्लो उर्दू हायस्कूल तसेच बाहेती महाविद्यालयावर बाहेरच्या लोकांकडून विद्यार्थ्यांना कॉफ्या पुरविण्यात येत होत्या. पथक तसेच पोलीस येण्याची सुचना होत्या मिळताच कॉफ्या पुरविण्यांमध्ये धावपळ होत होती. तर शहरातील इतर केंद्रावर चोरी चोरी चुपके चुपके आतल्या आत विद्यार्थी कॉफ्या करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

भरारी पथक नावालाच
प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे भरारी पथकाची शिक्षण विभागाकडून नियुक्ती करण्यात आली होती. यात काही संवेदशील केंद्रावर पथकाची नजर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत कॉफ्यांचा पाऊस पडल्याने भरारी पथक नावालाच असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात इतर ठिकाणी कॉफी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. मात्र शहरात एकाही केंद्रावर कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता, सकाळच्या वेळी शहरात उपशिक्षणाधिकारी नेरकर यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. मात्र कुठलाही अनुचित प्रकार आढळून आला नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगणयात आले.

विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही परिक्षा
बारावीच्या पेपरमुळे शहरात सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग दिसून आली. पाल्याच्या परीक्षेसाठी अनेक पालकांनी नोकरी-व्यवसायातून सुटी काढत पाल्यासोबत परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. वेळेच्या नंतर येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाण्याच्या स्पष्ट सूचना बोर्डाने दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी 9 वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. अनेकांनी खासगी वाहनाने पाल्यांना सोडत तर अनेकांनी रिक्षा आणि बससेवेचा पर्याय निवडत परीक्षा केंद्र गाठले. पेपर कसा गेला याबाबत विद्यार्थ्यांनी कठीण व मध्यम अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.

वर्गात गेला मोबाईल
शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात देखील सर्रास कॉपी चालली. पहिला तास शांततेत गेल्यानंतर बाहेरून कॉपी पुरविणार्‍यांची धावपळ सुरू झाली होती. यात साडेबाराच्या सुमारास थेट वर्गात मोबाईल देण्याचा प्रकार येथे पाहण्यास मिळाला. बाहेर उभ्या असलेल्या एका युवकाने आपल्या मित्राला प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढण्यासाठी थेट मोबाईल वर्गात देण्यात आला. मात्र मोबाईल पॅटर्न लॉक असल्याने त्याचे लॉक उघडण्यात अडचणी आल्याने संबंधीताने मोबाईल बाहेर फेकून दिला होता.

हॉमगार्डनेच पुरवल्या कॉपी
शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात चक्क बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्डने काही विद्यार्थ्याना कॉप्या पुरविल्याचा प्रकार पाहण्यास मिळाला. या होमगार्डने गेटबाहेरील असलेल्या परिक्षार्थीच्या नातेवाकांकडून कॉपीच्या झेरॉक्स व पैसे घेतल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे आता बंदोबस्तासाठीच असलेले होमगार्ड कॉप्याची सोपी लाइन लावत असल्यामुळे कॉपी बहाद्दरांची सोय झाली आहे.

प्रेयसीला आईस्क्रीम
इंग्रजी विषयाने घाम फुटतो हे लक्षात घेऊन एका अवलिया प्रियकराने महाविद्यालयाच्या तारेच्या कंपाऊडवरून उड्या मारत आपल्या प्रियसीला कॉपी पुरवण्याऐवजी थंडगार आईस्क्रीम पुरवली. यावेळी हा प्रसंग पाहताना अनेकांना हसू आवरले गेले नाही.