परीट समाज आरक्षण हक्क परीषदेच्या राज्याध्यक्षपदी विवेक ठाकरे

0

जळगाव- महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी म्हणून जळगाव (खान्देश) येथील समाजाचे ज्येष्ठ संघटक विवेक देविदास ठाकरे यांची महाराष्ट्र परीट (धोबी) समाज आरक्षण हक्क परीषदेच्या राज्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र यशवंतराव खैरनार यांनी नुकतीच एका पत्रान्वये ही नियुक्ती केली.

15 दिवसात कृती कार्यक्रम जाहीर करणार
महाराष्ट्रात मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असतांना राज्यातील परीट (धोबी) जातीला यापूर्वी असलेले अनुसूचित जातीच्या (एस.सी.) सवलती पूर्ववत लागू करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला शिफारस करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मोर्चे, आंदोलने असे रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन मार्गाने शासनाला यासाठी भाग पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी विवेक ठाकरे यांना या नियुक्तिद्वारे अधिकार देण्यात आले आहे. याबाबत राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करून 15 दिवसात आगामी कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे नवनियुक्त अध्यक्ष विवेक ठाकरे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.

विवेक ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
परीट समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष किसनराव जोर्वेकर ,युवा प्रदेशध्यक्ष संतोष भालेकर,अ‍ॅड.राणी रंधे-तळेकर, तंटामुक्ती समिती प्रदेशध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, ज्येष्ठ संघटक व सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त सुधीर खैरनार, जळगाव जिल्हाध्यक्ष अरुण शिरसाळे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांकडून नियुक्तीबद्दल विवेक ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.