देहूरोड : गुलाबी थंडी आणि डोंगरावरील अल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची पावले शेलारवाडीजवळच्या घोरावडेश्वर टेकडीकडे वळू लागली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशेषतः शनिवारी- रविवारी आणि शासकीय सुट्ट्यांदिवशी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याचे दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रातील धुराड्यांतून बाहेर पडणारा धूर आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे घुसमटलेल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी हा डोंगर आता आकर्षण ठरू लागला आहे. मात्र, त्या दिवशी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने त्याचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे.
छोट्या सहलीचा बेत
थंडीचा कडाका आणखी वाढत असताना सुखद वातावरणाचा आनंद घेण्यासाठी घोरावडेश्वर डोंगरावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पिंपरी चिंचवडसह पुणे आणि आसपासच्या परिसरातूनही पर्यटक सहकुटूंब या डोंगरावर पर्यटनासाठी येताना दिसू लागले आहेत. सहलीचे सर्व साहित्य आणि सोबत खाण्याचे पदार्थ असा बेत करून अनेक मंडळी येथे येतात, आणि तासन्तास निसर्गाचा आनंद घेताना दिसतात.
दीड कि.मी लागते वाहनांची रांग
दरम्यान, पर्यटकांच्या गाड्या लावण्याची सोय अपुरी असल्यामुळे महामार्गावरच वाहने लावली जातात. सुटीदिवशी या वाहनांची रांग एक-दिड किलोमीटरपर्यंत पोहचते. मुळातच अपघाती क्षेत्र असलेल्या या परिसरात होणारी वाहनांची गर्दी हा आता चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाचा आनंद लुटताना वाहने सुरक्षित लावण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे. तर पर्यटकांनी सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन वाहने योग्य ठिकाणी लावावीत, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.