19 नोव्हेंबरपासून मुंबईत प्रत्येक रविवारी जहांगीर आर्ट गॅलरीसमोर पर्यटकांसाठी खुले व्यासपीठ सुरु होणार
मुंबई। सांस्कृतिक, कला, नाटय, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार मुंबईकर व मुंबईला भेट देणा-या देशातील पर्यटकांना पाहता यावेत यासाठी मुंबईत जहांगीर आर्ट समोर खुले व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. हे व्यासपीठ 19 नोव्हेंबरपासून सुरु केले जाणार आहे. दर रविवारी आयोजित केल्या जाणार्या या खुल्या व्यासपीठाच्या जागेची पाहणी अतिरिक्त आयुक्त ए. एल. ज-हाड यांनी अधिका-यांसमवेत गुरुवारी केली. 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार्या या सांस्कृतिक, कला, नाटय्, चित्रपट व संगीत कार्यक्रमास लागणा़र्या सर्व सेवा-सुविधांबाबतही आढावा घेतला. यावेळी त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरी समोरील चौकातील चौक व आजुबाजूच्या पदपथांची दुरुस्ती, चौकाची रंगरंगोटी व वृक्ष फाद्यांची योग्यरित्या छटाई तसेच हा परिसर आकर्षक दिसेल याबाबत कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिले. के. दुभाष मार्गावर ज्या ठिकाणी हे ’खुले व्यासपीठ’ असणार आहे, त्या रस्त्यावरील वाहनतळ शनिवारी, 18 नोव्हेंबर दुपारनंतर बंद करण्यात येणार असून रविवार, दिनांक 19 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत सदर वाहनतळ बंद राहील. या ठिकाणी असलेले इतर वाहनतळ नेहमीप्रमाणेच वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.
रविवारी दिवसभर कार्यक्रम
देशी तसेच विदेशी पर्यटकांना आपल्या कलाकृती आणि संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी बृहन्मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे 19 नोव्हेंबरपासून मे, 2018 अखेरपर्यंत दर रविवारी होणार्या ’खुले व्यासपीठ’ या संकल्पनेतून मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी केले आहे. तसेच अशा व्यासपीठामुळे मुंबई शहराच्या पर्यटनाला विशेषतः भारतीय पर्यटनाला अत्यंत पोषक अशी भूमिका बजावणार असल्याचे ज-हाड यांनी सांगितले. या महोत्सवात जास्तीत-जास्त कलावंतानी सहभागी व्हावे म्हणून बृहन्मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे संयुक्तरित्या प्रयत्न असल्याचेही ज-हाड यांनी स्पष्ट केले.
नामवंत कलावंत लावणार हजेरी
हे खुले व्यासपीठ विविध कलागुण सादर करणा-या कलावंतांसाठी एक पर्वणी ठरणार असल्याने पहिल्या दिवसापासूनच अनेक कलावंतानी 19 नोव्हेंबर रोजी होणा-या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच या कलाकारांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुंबई शहराचा सांस्कृतिक वारसा वृंद्धिगत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे विविध क्षेत्रातील नामवंत कलावंत देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्य असे खुले व्यासपीठ उभारते आहे. हे खुले व्यासपीठ 18 मे पर्यंत दर रविवारी सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 दरम्यान कलाकारांसाठी उपलब्ध राहणार आहे, असेही ज-हाड यांनी सांगितले.