पर्यटनातून पन्हाळेदुर्ग लेण्यांचा होणार कायापालट

0

दापोली – दापोली तालुक्यातील पन्हाळेदुर्ग येथील प्राचीन 29 लेण्यांचा शासनाच्या पर्यटन विकास निधीतून कायापालट होणार आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लेण्यांना झळाळी मिळणार आहे. या लेण्यांच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे समजते. यामुळे पन्हाळेदुर्गचा कायापालट होणार आहे.

पन्हाळेदुर्ग येथील कोठजाई नदीकाठी पुरातन 29 प्राचीन लेण्या असून, या लेण्यांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध या धर्मियांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, शिवलिंग इत्यादी देवांची कोरीव शिल्प तर हत्ती, सिंह आदींची त्यामध्ये कोरीव सुबक अशी शिल्प आहेत. पन्हाळेदूर्ग गावाची प्राचीन काळातील एक गाव अशी वेगळी ओळख आहे. पन्हाळेदूर्ग या ठिकाणी प्राचीन असणार्‍या एकूण 29 लेण्या दुर्लक्षित होत्या. कोठजाईनदीचे पात्र वाढत चालल्याने या ठिकाणी असणार्‍या लेण्यांचे अस्तिव धोक्यात आले होते. मात्र शासनाने पर्यटन विकास निधीतून धोक्यात आलेले लेण्यांचे अस्तित्व कायमस्वरुपी सावरण्यास मदत केली आहे.

स्थानिकांना रोजगार मिळणार
लेण्यांकडे जाणारा मार्ग हा खराब असल्याने या लेण्यांकडे जाण्यासाठी पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाकडून पन्हाळेदुर्ग लेण्यांचा विकास झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळून येथील स्थानिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

लेण्यांच्या सुशोभिकरणासाठी शासनाच्या पर्यटन विकास या निधीतून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या लेण्यांच्या मंजूर आराखड्याला हिरवा कंदील मिळाला असून, लवकरच येथील लेण्यांच्या सुशोभिकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने पन्हाळेदुर्ग गावाचा शासनाच्या माध्यमातून कायापालट होणार आहे.