पर्यावरणपूरक विसर्जनाला अल्प प्रतिसाद

0

४० टन अमोनियम बायकार्बोनेट शिल्लक; जनजागृती कमी पडली की नेते, अधिकार्‍यांची उदसीनता?

पुणे । शहरात दरवर्षी सुमारे ६ लाख गणेश मूर्तीची विक्री केली जाते त्यातील ५ लाख मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जातात या मूर्ती पाण्यात व्यवस्थित विरघळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. यामुळे महापालिका आणि कमिन्स इंडिया यांनी रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने खाण्याचा सोडा (अमोनियम बायकार्बोनेटचा) वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने तब्बल १ लाख गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा मानस यावर्षी देखील केला होता. मात्र महापालिकेकडून योग्य प्रकारे त्याचा प्रचार-प्रसार न झाल्याने ही संकल्पना लोकांपर्यंत पोचू शकली नाही आणि जनमानसात रुजली नाही. त्यामुळे ४० टक्के अमोनियम बायकार्बोनेटचा साठा महापालिकेकडे पडून आहे.

पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षीपासून महापालिका, कमिन्स इंडिया यांनी रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ खाण्याचा सोडा वापरून शास्त्रीय विघटनातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन करून पर्यावरणाची होणारी हानी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेकडून ५५ टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप २४ हजार २५० पुणेकरांना केले होते. तर ३२ टन बायकार्बोनेटचा वापर हौदामध्ये पालिकेतर्फे करण्यात आला होता.

यंदाही १०० टन बायकार्बोनेटची खरेदी
यंदाच्या वर्षी १०० टन बायकार्बोनेट खरेदी करण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल ४० टन अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना वाटण्यात आले असून तब्बल ४० टन हौदात वापरण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षीचे २० टन शिल्लक आणि यंदाचे १०० टन असे १२० टन अमोनियम बायकार्बोनेट वाटपाचे मानस होते. मात्र, त्यातील ८० टन वाटण्यात करण्यात आलेे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेमध्ये उदासीनता आहे की प्रशासन, राज्यकर्ते याचा प्रचार करण्यासाठी कमी पडले? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यावर्षी घरगुती स्वरूपात जास्त गणेशमूर्ती विसर्जित केल्या गेल्या, असे प्रशासनाचे जरी म्हणणे असले, तरी ज्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक होते ते झाले नाही? हे तितकेच खरे आहे.

हिंदूत्ववादी संघटनांचे आवाहन
महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे लक्ष ठेवले असले तरी दुसर्‍या बाजूला हिंदूत्ववादी संघटनांनी आमच्या धार्मिकबाबीत शासनाने हस्तक्षेप करू नये. वाहत्या पाण्यातच गणपतींचे विसर्जन करावे हे फलकही धरून त्या संघटनांचे कार्यकर्तेही घाटांवर उपस्थित होते. त्याचाही परिणाम झाल्याचे नाकारता येत नाही.

महापालिकेने मागच्या वर्षी जोरदार जनजागृती केली होती. मात्र यावर्षी शतकोत्तर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याच्या नादात सत्ताधार्‍यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे मागीलवर्षी इतकाच अमोनियम बायकार्बोनेटचा उपयोगा झाल्याचे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

महापालिकेने मागीलवर्षी एक लाख टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी केले होते. त्यातील ८० टन मोफत वाटण्यात आले. मात्र ते कसे वापरायचे याची माहिती देण्यात आली होती, मात्र किती वजनाच्या, किती उंचीच्या मूर्तीला किती प्रमाणात अमोनियम बाय कार्बोनेट वापरायचे हे मात्र सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांना त्याचा अनुभव नीट आला नाही. त्यामुळे मागील वर्षी ज्यांनी ते घेतले त्यातील अनेकांनी मूर्ती विसर्जन हौदात विसर्जित करणे पसंत केले. यंदा सुमारे ३९ हजार गणेशमूर्ती वैयक्तिकरित्या, घरगुती स्वरूपात विसर्जित केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

वाघोली येथील खाणीत विसर्जित
विसर्जन हौद, तसेच नदी काठावर तरंगणार्‍या गणेश मूर्ती बहुतांश ठिकाणच्या काढण्यात आल्या असून, त्या वाघोली येथील खाणीत विसर्जित करण्यात आल्या आहेत.