पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

0

भुसावळ। मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण निसर्गाकडून केवळ घेणे सोडून निसर्गाच्याप्रती असलेल्या कर्तव्याची देखील जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. पर्यावरण संवर्धन हि प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांचे संगोपनाची आवश्यकता आहे. आपल्या सभोवताली असणारे सजीव आणि निर्जीवांचे विश्व म्हणजेच पर्यावरण. आपल्या राज्यातील वनांचा टक्का 20 टक्क्यांपर्यंत खाली आलेला असून पुढील परिस्थिती अत्यंत वाईट होणार आहे. त्यामुळे सजग होऊन जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा असे आवाहन मुख्य अभियंता माधव कोठुळे यांनी केले.

घरोघरी जाऊन वृक्षांचे केले वाटप
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात नविन क्रीडा संकुलात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता माधव कोठुळे तर उपाध्यक्षस्थानी उपमुख्य अभियंता एल.बी. चौधरी आणि एन.पी. गगे होते. यावेळी प्रमुख वक्ता तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनविभागाचे उपवनसंवर्धक एस.एस. दहीवाले आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंवर्धक वाढाई ही तज्ञ मंडळी प्रमुख आमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वसाहतीमधून वृक्ष दिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडी दरम्यान वसाहतीत रोपे वाटप करण्यात आली. तरुण, वृध्द तसेच गृहिणींना रोपे वाटप करण्यात आली. वृक्षदिंडी नवीन क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आल्यावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्तविक पर्यावरण विभाग प्रमुख व्ही.डी. सोनवणे यांनी केले. मुख्य अभियंता एल.बी. चौधरी यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कामास स्वत:च्या किचन पासून सुरुवात करावी असे आवाहन करीत पर्यावरणाचा व्यापक दृष्टीकोन सांगितला. वनविभागाचे उपवनसंवर्धक एस.एस. दहीवाले यांनी शासनाच्या विविध योजनांची तसेच उद्दिष्टांची माहिती दिली.

स्पर्धांचे पारितोषिक वितरण
यावेळी उपस्थितांसाठी पर्यावरण आणि सर्वसामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. शेवटी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी चातक निसर्ग संवर्धन टीमचे अनिल महाजन यांच्या वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी यांनी मोठा प्रतिसाद या प्रदर्शनास दिला. जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांनी तर आभार प्रविण बुटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.पी. निकम, एस.जी. यावले, लक्ष्मीकांत नेवे, बाबा जावळे तसेच पर्यावरण विभाग, स्थापत्य विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.