धुळे । पर्यावरणाचे संतुलन व संगोपनासाठी वृक्ष रोपणाचे कार्य नियमित व नियोजनबध्दरित्या राबविण्याचा मनोदय राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक चंद्रकांत गवळी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केला. शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध जातीच्या वृक्षांची लागवड समादेशक चंद्रकांत गवळी यांच्याहस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यस्तरावर पारितोषिकाद्वारे गौरविले
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 ला यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अंतर्गत राज्यस्तरावर तृतीय तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे. जिल्ह्यात पाण्याची टंचाई असलेल्या भागातही पाण्याचे योग्य नियोजन व वृक्षांच्या संगोपनासाठी गटातील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. गट परिसरात आ.कुणाल पाटील यांच्या जवाहर फाऊंडेशनच्या जलयुक्त शिवार अंतर्गत तळ्यातील गाळ काढण्यात आला असून गटाचा माळ रानाचा व खडकाळ परिसरही नयनरम्य व सुशोभित झाला आहे.
3 हजार झाडे लावण्याचा मानस
या वृक्षारोपण कार्यक्रमात आवळा, सिताफळ, आंबा, शिसम, गुलमोहोर, अशोक यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. जागतिक पर्यांवरण दिवसाचे औचित्य साधून राज्य राखीव पोलीस बलातर्फे सामाजिक उपक्रमांची सुरूवात करण्यात आली. या बलाच्या वतीने परिसरात एकूण 3 हजार झाडे लावण्यात येणार असून त्यासाठी 3 हजार खड्डेही खोदण्यात आली आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतर वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
तळ्यातील गाळ काढला
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य राखीव पोलीस बलाच्या प्रयत्नांचा सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच जिल्ह्यांतील पाणी टंचाईंची समस्या असलेल्या भागात पाण्याचे नियोजन करीत आहेत. बलाच्या याकार्यांमुळे त्यांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या वृक्षरोपण कार्यक्रमास गटाचे सहाय्यक समादेशक ए.एस.कदम, एस.ए. पाटील व राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.