नवी दिल्ली: ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष संदेश दिला आहे. ट्वीटरवरून मोदींनी एक व्हिडियो शेअर केला असून त्यात त्यांनी ‘पर्यावरण आणि पृथ्वी यांचा आपल्याला नेहमी अभिमान असायला हवा. आज पर्यावरण दिनानिमित्त पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहायला हवे. उज्ज्वल भविष्यासाठी निसर्गाशी सुसंगत राहणे गरजेचे आहे, असा संदेश दिला आहे.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. हा हेतू लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे. दरवर्षी हजारो निष्पाप नागरिक वायू प्रदूषणाला बळी पडत असल्याने यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी ‘वायू प्रदूषणा’वर प्रकाश टाकला आहे. आशिया-पॅसिफिकमध्ये जवळपास चार दशलक्ष लोक वायू प्रदूषणमुळे मृत्यूमुखी पडतात.