पलाश सोसायटीत ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत

0

वाकड :- वाकड परिसरातील पलाश सोसायटीत ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प सुरू आहे. 295 सदनिका येथे असून त्यातून महिन्याला सुमारे साडेचार हजार किलो कचरा रोज तयार होतो. या ओल्या कचर्‍यापासून आठशे किलो कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्पासाठी तब्बल दहा लाख खर्च आला आहे. सुरूवातीला वैयक्तिक पातळीवर सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला व्यापक स्वरूप आले. मात्र, मायक्रो बायलॉजीचा अभ्यास झालेल्या स्वाती कोरडे यांनी रहिवाश्यांपुढे कंपोस्ट खताचा प्रकल्प व्यापक स्वरूपात उभारण्याचा विचार मांडला. त्याला सर्व रहिवास्यांनी मान्यता दर्शवत ऑगस्ट 2017 मध्ये प्रकल्प सुरू झाला.

यामध्ये सोसायटीतील झाडांचा पालापाचोळाही प्रकल्पात वापरला जातो. कचर्‍याच्या गाडीत केवळ सुकाच कचरा टाकला जातो. अगोदर वैयक्तिक पातळीवर हा प्रयोग राबवण्यात आला. याबाबत कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या एक टन कंपोस्ट खत पडून असून शेतकर्‍यांना माफक दरात ते देण्याचा सोसायटीचा मानस आहे. सोसायटी दरवर्षी वृक्षारोपण करते. सोसायटीत बाराशे छोटी-मोठी झाडे असून कंपोस्ट खतामुळे त्यांची चांगली वाढ होते. पवन चक्की व सौर ऊर्जा प्रकल्पही आहे. 95 सदनिकांना वॉटर सोलर असून रेनवॉटर हार्वेटींगमध्ये गच्चीसह परिसरातील पाणी साठवले जाते. पाणी बचतीसाठी सर्व सदनिकांत नळाला नोझल बसविले आहे.

लहानांनाही पर्यावरणाचे धडे
पलाश सोसायटीचे अध्यक्ष किरण वडगामा म्हणाले की, आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो. यंदा महापालिका स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला असून सोसायटीतील लहान मुलांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. तसेच कागदी रद्दीच्या बदल्यात एका एनजीओकडून कागदी पिशव्या घेऊन त्याचा वापर रहिवाश्यांनी सुरू केला आहे.