शिरपूर। तालुक्यातील पळासनेर परीसरात गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. तीन दिवसांपासून वीज खंडीत राहण्यास वीज मंडळच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तालुक्यात तीन दिवसापुर्वी जोरदार वारा वादळ आले होते. या वादळात पळासनेर परीसरात अनेक झाडेे उन्मळुन पडले होते. त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडीत झाला होता. तब्बल 72 तासानंतर देखील वीज पुरवठा सुरळीत करण्यास वीज मंडळाला यश आलेले नाही. त्यामुळे वीज मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पाण्यासाठी वणवण
परीसरात वीज नसल्याने तेथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठ्या अभावी कृत्रीम पाणी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना पाण्यासाठी बिजासनी माता मंदिराच्या परिसरात जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर गुरं ढोरांना गावाबाहेरील विहिरीमधून बदलीच्या साहाय्याने पाणी काढून पाजावे लागत आहे. दरम्यान सांगवी गावाला देखील तीन दिवसापूर्वी वीज गेली होती. परंतु सोमवारी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र सांगवी पळासनेर भागात पावसाळा सुरू झाला की विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असतो. परंतु वीज मंडळाचे अधिकारी ,कर्मचारी नागरिकांचे फोन देखील उचलत नसल्याने याकडे नेहमीच विद्यत महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रारी परिसरातून होत आहेत.