पवनाथडी जत्रेबाबत अनिश्‍चितता?

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेने बुधवारी ’लकी ड्रॉ’ काढले आहेत. परंतु, पवनाथडी जत्रेबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. कारण, पवनाथडी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होताना दिसून येत नाही. त्यामुळे पवनाथडी जत्रा स्थगित करण्याची मागणी केलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र पालिका प्रशासनाला मिळाले आहे.

दहा वर्षांची परंपरा
महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय घराणे पवार कुटुंबियांच्या वतीने पुण्यात भीमथडी जत्रा भरविली जाते. भीमथडीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे दहा वर्षापूर्वी पासून पवनाथडी जत्रे भरविण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 11 वे वर्ष आहे.

एकूण 436 स्टॉल
यंदा सांगवीतील पीडब्लूडी मैदान येथे 4 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. या जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी महापालिकेने बचत गटांकडून अर्ज मागिविले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून पालिकेकडे एक हजार 12 अर्ज प्राप्त झाले होते. पालिका या जत्रेत 436 स्टॉलची उभारणी करणार आहे. त्यासाठी बुधवारी उपमहापौर शैलजा मोरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकरी यांच्या हस्ते ’लकी ड्रॉ’ काढण्यात आले. 1 हजार 12 अर्ज आल्यामुळे पालिकेने ’लकी ड्रॉ’ काढले आहेत. यामध्ये 1 ते 5 स्टॉल अपंग महिलांकरिता राखीव ठेवण्यात आले असून 6 ते 222 स्टॉल वस्तू विक्रीचे आहेत. तर, 223 ते 330 असे एकूण 107 स्टॉल शाकाहरी खाद्य पदार्थाचे असून 331 ते 436 असे एकूण 107 स्टॉल मांसाहरी खाद्यपदार्थांचे आहेत. परंतु, या जत्रेबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

80 लाखांची तरतूद
पवनाथडी जत्रेसाठी महापालिकेने 80 लाख रुपयांची बजेटमध्ये तरतूद केली असून कदाचित यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. मागील काळातील अनुभव पाहता या उपक्रमातून बचतगटांना विशेष कार्य साध्य होईल अशी स्थिती दिसून येत नसून महिला बचत गटांना याचा यथावकाश फायदा होताना दिसत नाही. तसेच या उपक्रमातील खर्च निरर्थक होणार आहे. तरी, पवनाथडी जत्रा हा उपक्रम स्थगित करण्याची मागणी केलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र पालिका प्रशासनाला मिळाले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन लकी ड्रॉ काढल्यानंतर देखील पनाथडी जत्रा स्थगित करते की भरविते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पवनाथडी स्थगित करण्याबाबतचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र माझ्यापर्यंत अद्याप आले नाही. मी तपासतो आणि सांगतो.
-श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका