पिंपरी चिंचवड : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ’जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुसर्या पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वात पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकार, सिने अभिनेते, अभिनेत्री, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात उपस्थित राहून श्रमदान केले. दुसर्या पर्वाची सुरुवात स्वराज्य रक्षक संभाजी, तू माझा सांगाती फेम सायली राजहंस-सांभारे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर येत्या रविवारी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जुनिअर मकरंद अनासपुरे येणार आहेत.
पवना नदी जलपर्णीमुक्तसाठी योगदान…
विविध क्षेत्रातील मान्यवर ’जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानात सहभागी झाले. नागरिकांनी स्वतःहून येऊन पवना नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी योगदान दिले. विविध क्षेत्रातील मंडळी देखील या उपक्रमात सहभाग घेत असल्याने नागरिकांची देखील संख्या वाढतीच राहिली. त्यामुळे पवना नदीला जलपर्णीमुक्त करण्यात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीला यश आले आहे. रविवारी (दि. 28) ज्युनिअर मकरंद अनासपुरे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांचा विनोदी कार्यक्रम देखील सादर होणार आहे. शहरातील स्वच्छता दूत, पर्यावरण प्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी उत्तम मेजवानी या माध्यमातून मिळणार आहे.
केजुबाई बंधार्यावर उपक्रम..
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे ’जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ हे अभियान रविवारी चिंचवड मधील आदित्य बिर्ला रुग्णालयाजवळ केजुबाई बंधारा येथे होणार आहे. शहरातील नागरिकांनी या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी केले आहे.