पवना धरणग्रस्तांचे बेमुदत उपोषण चार दिवसानंतर मागे

0

धरणग्रस्तांच्या विविध मागण्या दहा दिवसात सोडविण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आश्‍वासन

इंदोरी । मावळ तालुक्यातील इंदोरी येथील पवना धरणग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी या धरणग्रस्तांच्या विविध मागण्या दहा दिवसात सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण 1 मार्चला ते मागे घेण्यात आले.

धरणग्रस्तांच्या विविध मागण्या
इंदोरी येथील गट नंबर 120 क्षेत्रातील शेतकर्‍यांचा फाळणी बारा होऊन स्वतंत्र सातबारा मिळावा, उर्वरीत पवना धरणग्रस्तांचे त्वरित पुनर्वसन करावे, गट नंबर 120 क्षेत्रातील वनीकरण क्षेत्र कमी करून शेती क्षेत्र करावे, गट नंबर 120 क्षेत्रातील पोट खराब क्षेत्राऐवजी लागवड योग्य क्षेत्र करावे, गट नंबर 120 क्षेत्रात पक्का रस्ता करण्यात यावा, प्रकल्पग्रस्त म्हणून मिळालेली शेत जमीन वर्ग 1 करावी, तलाठी निंबोळकर यांनी नवीन शर्त कमी करण्याच्या आदेशावर चुकीची नोंद केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, यांसारख्या विविध मागण्यांसंदर्भात संजय चव्हाण यांच्यासह धरणग्रस्त शेतकरी मावळ पंचायत समिती चौकात उपोषणाला बसले होते. त्यांच्या न्याय मागण्यांना मावळ तालुक्यातील अनेकांनी पाठिबा दिला.

दहा दिवसात मागण्या पूर्ण
गुरुवारी मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी संजय चव्हाण यांच्या मागण्या पुढील दहा दिवसात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मावळचे तहसीलदार रणजीत देसाई, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, नायब तहसीलदार रामकुमार गभाले तसेच अनंत चंद्रचूड, अ‍ॅड बबनराव म्हाळसकर, मनोज ढोरे, अनिल ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.